नवी दिल्ली : आता घरच्या घरी वीजनिर्मिती करणं शक्य होणार आहे. घराच्या छतावर सोलर पॅनल लावून विजेची किलोवॅटमध्ये निर्मिती करणं आता सामान्य माणसांच्या आवाक्यात येणार आहे. यासाठी पूर्व प्रकल्पासाठी केवळ 60 हजार रुपये मोजावे लागतील. किंबहुना, जर केंद्र सरकारकडून यासाठी 30 टक्के अनुदान मिळालं, तर हीच रक्कम आणखी कमी होईल.


म्हणजेच एका स्मार्टफोनच्या किंमतीत दोन पंखे आणि दोन ट्युबलाईट्सला जितकी विज लागेल, तिचा खर्च निघेल, एवढी विजेची सामान्य माणूस घरच्या घरीच निर्मिती करु शकेल.

तुम्ही सुमारे 50 हजार रुपये सोलर पॅनल्समध्ये गुंतवले, तर जवळपास 3 वर्षे तुम्हाला विजेचा फायदा घेता येईल. एक वर्षापूर्वी सौर उर्जेच्या प्रत्येक किलोवॅटमागे 90 हजार रुपयांचा खर्च येत होता.

गेल्या पाच ते सहा वर्षात सोलर मॉड्युल्सच्या किंमती जवळपास 85 टक्क्यांनी घटल्या आहेत, असे सौर उर्जेच्या क्षेत्रात काम कऱणाऱ्या ब्रिज टू इंडियाचे असोशिएट डायरेक्टर जसमित खुराना यांनी सांगितले.

एका वर्षाचा विचार केल्यास एक किलोवॅट वीज म्हणजे 1400 यूनिट विजेच्या बरोबरीची आहे. सोलर पॅनल सिस्टम 25 वर्षे राहते. त्यामुळे सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती नक्कीच फायदेशीर ठरतान दिसते आहे.

सोलर पॅनल बसवायचे असल्यास उघड्यावर (सावली येत नसेल अशी जागा) किमान 120 स्केअर फूट एवढी हवी. राजधानी दिल्लीत सौर उर्जेची क्षमता 2200 मेगावॅट आहे आणि दिल्लीची विजेची एकूण मागणी 6600 मेगावॅट आहे.

ग्रीनपीस इंडियाचे कॅम्पेनर पुजारीनी सेन यांनी सोलर पॅनलचा खर्च कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “सोलर पॅनल आर्थिकदृष्ट्या सोईचं झाल्याने प्रदुषणावर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. 2022 सालापर्यंत 100GW सौरउर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट भारताचं आहे.”