नवी दिल्ली: 2016 हे वर्ष नवोदित तरुणांना चांगले गेल्याचे दिसत आहे. कारण, गतवर्षीच्या आर्थिक उलथापालथीची आकडेवारी समोर येत असून, त्यानुसार, 2016 मध्ये नवोदित तरुणांना कंपन्यांकडून वर्षाला सहा लाखापेक्षा जास्त पगाराचे पॅकेज मिळण्यात तब्बल 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली असून, 2015पासून 6 लाखापेक्षा जास्त वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्यांमध्ये 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फ्रेशर्सना विविध ठिकाणच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारे वेब पोर्टल मायएमकॅट डॉट कॉम आणि नोकऱ्यासंदर्भातील विश्लेषण करणारी कंपनी एस्पायरिंग माईंडस् यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

या सर्वेक्षणानुसार, फ्रेशर्स आणि कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असलेल्या तरुणांना 2 ते 3 लाखाचे वार्षिक पगाराचे पॅकेज दिले जाते. पण 2015पासून सहा लाखापेक्षा अधिकचे पॅकेज देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये तब्बल 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे गतवर्षात नवोदित तरुणांना अच्छे दिन उपभोक्ता आल्याचे बोलले जात आहे. तसेच आगामी 2017 मध्ये अशाचप्रकारच्या नोकऱ्या कितीप्रमाणात उपलब्ध होतील याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे.