धक्कादायक म्हणजे, अवघ्या इंटरनेट जगताला हादरवणाऱ्या आणि फेसबुकच्या विश्वासार्हतेसह सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या या प्रकारावर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे काहीच ठोस उत्तर नाही.
खरंतर वैयक्तिक माहिती युजर्सच्या परवानगीविना वापरण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही आणि फेसबुकच्या बाबतीत तर नाहीच नाही. युजर्सही अनेकविध प्रकारे फेसबुकसोबत आपली खासगी माहिती शेअर करतात. ही माहिती युजर्सच्या परवानगीविना फेसबुक आपल्या फायद्यासाठी वापरत असते. मात्र, केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने ज्या संख्येत युजर्सची माहिती मिळवून, तिचा गैरवापर केल्याच आरोप आहे, ते अत्यंत गंभीर प्रकरण मानले जात आहे.
फेसबुक आणि युजर सिक्युरिटी अशा मुद्द्यांवरुन अनेकदा वाद-विवाद झाले आहेत. मात्र केम्ब्रिज अॅनॅलिटिकाशी संबंधित प्रकरणावरुन वादाला गंभीर वळण मिळाले आहे. ट्विटरवर तर फेसबुकविरोधात मोहीम उघडली गेलीय आणि #DeletFacebook नावाने कॅम्पेन चालवले जात आहे.
आता आपण जाणून घेऊया, युजर्स फेसबुकवरुन आपली खासगी माहिती नेमक्या कशा प्रकारे शेअर करतात.
ब्राऊजिंग डिटेल
जेव्हा तुम्ही फेसबुकवर ऑनलाईन येता, त्यावेळी एकूण तीन माध्यमातून तुमच्या प्रत्येक डिजिटल हालचालीवर नजर ठेवली जाते.
- तुमचं ब्राऊजिंग म्हणजे, तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल सर्च करत आहात, याची माहिती इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला असते.
- होस्ट वेबसाईट म्हणजे, ज्या वेबसाईटचा तुम्ही वापर करत आहात, त्या वेबसाईटच्या अॅडमिनना तुमच्या ब्राऊजिंग डेटाची माहिती असते..
- फेसबुकवरुन एखाद्या लिंकवर क्लिक करता, त्यावेळी तुमचा कशात रस आहे, याची माहिती फेसबुकला कळत असते.
फेसबुक कनेक्ट
आपल्या युजर्सची माहिती मिळवण्यासाठी फेसबुककडे सर्वात सोपा उपाय असतो, तो म्हणजे ‘Connect with Facebook’.
सिमिलर टेकच्या रिपोर्टनुसार, जवळपास 50 लाखांहून अदिक वेबसाईट फेसबुकच्या माध्यमातून लॉग-इन करण्याची सुविधा देतात. फेसबुकवरुन लॉग-इन करणे, हा अगदी सोपा उपाय म्हणून अनेकदा युजर्सही तो अवलंबतात. जेव्हा तुम्ही ‘Connect via Facebook’ या पर्यायवर क्लिक करतात, त्यावेळी तुम्ही फेसबुकवरील तुमची खासगी माहितीही त्या वेबसाईटसोबत शेअर करत असता.
ऑनलाईन गेम
हल्ली फेसबुकवर ऑनलाईन गेम्सची चलती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन गेम्स युजर्सच्या न्यूज फीडवर घिरट्या घालत असतात. उदा. ‘तुमचे खास मित्र कोण आहेत, हे जाणून घ्या?’ किंवा ‘तुमचं व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे जाणून घ्या?’ इत्यादी. विशेष म्हणजे, अशा गेम्समधील युजर्सचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या गेम्सवर क्लिक करता, त्यावेळी फेसबुकवरील तुमची माहिती थर्ड पार्टी वेबसाईटला देत असता. यामध्ये तुमची फ्रेण्ड लिस्ट आणि चॅटचाही समावेश असतो. त्यामुळे काही क्षणिक आनंदासाठी तुम्ही हे गेम्स खेळता, मात्र तुमची वैयक्तिक माहिती अनोळखी लोकांना देत असता.
कुकीज
तुम्ही जेव्हा कधी ऑनलाईन असता, त्या त्या वेळी कुकीज (Cookies) हा पर्याय बघितला असेल. कुकीजच्या माध्यमातून फेसबुक युजर्सच्या अॅक्टिव्हिटी आणि संबंधित माहिती गोळा करतं. या कुकीजबद्दल बोलताना फेसबुककडून कायम सांगितले जाते की, या माहितीचा उपयोग करुन युजर्सचा फेसबुकवरील वावर अधिक सोपा व्हावा आणि ठिकाणानुसार कंटेट पुरवण्यासाठी केला जातो.
2007 मध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी डेव्हलपर्सला निमंत्रित केले होते. त्यावेळी फेसबुककडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, थर्ड पार्टी वेबसाईट्सना फेसबुक युजर्सची फ्रेण्ड लिस्ट, लाईक्स, युजर बिव्हेइयर यांच्याशी संबंधित माहितीचा अॅक्सेस दिला जाईल.
धक्कादायक म्हणजे, फेसबुकच्या माध्यमातून जेव्हा तुमची खासगी माहिती एखाद्या थर्ड पार्टी वेबसाईटकडे जाते, त्यावेळी त्यांच्याकडून ती माहिती नष्ट करण्याचा पर्याय फेसबुककडेही नाही. म्हणजे तुमची माहिती थर्ड पार्टी वेबसाईटकडे कायमची राहते. त्या माहितीचा कसा वापर केला जाईल, यावर कुणाचेही नियंत्रण नसते. किंबहुना, तसे नियंत्रण ठेवताही येत नाही.
केम्ब्रिज अॅनॅलिटिकाच्या प्रकरणामुळे तर स्पष्टपणे समोर आले आहे की, फेसबुकवरील तुमच्या खासगी माहितीचा वापर राजकीय हेतूंसाठी होऊ शकतो. कारण केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने फेसबुकवरील युजर्सच्या खासगी माहितीचा वापर डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे.
संबंधित बातम्या :
वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक
'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद
डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’
फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान