नवी दिल्ली: भारतात आता परदेशातील प्रत्येक गोष्टीला स्वदेशी पर्याय देण्यासाठी स्पर्धा सुरु झाल्याचं दिसतंय. व्हॉट्स अॅपला पर्याय संदेस, ट्विटरला पर्याय कू आले आहेत. आता गुगल मॅपला पर्याय म्हणून स्वदेशी मॅप माय इंडिया ( MapmyIndia) सुरु होत असल्याचं दिसतंय. हा प्रकल्प इस्त्रो आणि मॅप माय इंडियाच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार आहे.


मॅप माय इंडियाने आपल्या सोशल मीडियावरुन तसं जाहीर केलं आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरु करण्यात येत असल्याचं MapmyIndia ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नेव्हिगेशन किंवा इतर सुविधांसाठी गुगल मॅपवर अवलंबून राहण्याची गरज नाही.





या आधी ट्विटरला पर्याय म्हणून स्वदेशी अॅप कू चे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केंद्र सरकार तसेच अनेक सेलिब्रेटी करताना दिसत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाने कू वर आपले खाते उघडल्यानंतर तब्बल 30 लाख भारतीयांनी कू चे डाऊनलोड केल्याचं दिसून आलं. तसंच व्हॉट्स अॅपलाही स्वदेशी संदेस चा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे आता आत्मनिर्भर योजने अंतर्गत MapmyIndia ची घोषणा झाल्यानंतर खरोखर हे अॅप गुगल मॅपला टक्कर देण्यात यशस्वी होणार का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.


Koo app: ट्विटरला पर्याय ठरु पाहणारे स्वदेशी अॅप Koo काय आहे?


डिपार्टमेन्ट ऑफ स्पेसने MapmyIndia शी भागिदारी केली आहे असं इस्त्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याच्या निर्मितीसाठी NavIC, Bhuvan सारख्या स्वदेशी उपग्रहांची मदत घेण्याचं ठरलं आहे. NavIC लाच इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS) असंही म्हटलं जातंय. याचा विकासही इस्त्रोने केला आहे. तसेच Bhuvan या जिओ-पोर्टलचाही विकास इस्त्रोने केला आहे.


MapmyIndia मध्ये गुगलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. महत्वाचं म्हणजे भारताच्या सीमा दाखवताना गुगल मॅपकडून काहीवेळा जो घोळ होतो तो MapmyIndia मध्ये होणार नसल्याचं सांगण्यात येतंय. कारण यामध्ये सरकारने देशाच्या ज्या सीमा निर्धारित केल्या आहेत त्याच दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे भारताच्या अंखडतेचा आदर केला जाणार असल्याचंही MapmyIndia कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


WhatsApp ला टक्कर देणार स्वदेशी बनावटीचं Sandes अॅप, जाणून घ्या याचे गुणविशेष