नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाशी संबंधित काही अकाउंटवर बंदी घालावी असा केंद्र सरकारने आदेश दिला असतानाही ट्विटरने तसं करायला नकार दिला होता. त्यावरुन आता ट्विटरला झटका देण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट कू (Koo) वर अकाउंट उघडलं आहे. त्यानंतर कू च्या डाऊनलोडमध्ये 30 लाखांची वाढ झाल्याचं दिसून आलंय.
शेतकरी आंदोलनात संघर्षाचं केंद्र ठरलेल्या ट्विटरला धक्का देण्याची रणनीती केंद्र सरकारनं सुरु केल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात भारत सरकारनं 257 अकाउंटवर बंदी घालण्याची केलेली विनंती ट्विटरनं फेटाळली होती. त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कू वर अकाउट काढलं. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, पियूष गोयल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही कू चा वापर सुरु केला आहे.
आयटी मंत्रालयाशिवाय अन्य सरकारी विभागांनीही कू वर खातं उघडलं आहे. माय गव्ह, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इनफोर्मेटिक्स सेंटर (एनआईसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इनफोर्मेशन टेक्नोलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया यांनी देखील कू वर व्हेरीफिकेशन केले आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा ट्विटरला झटका, स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट Koo वर अकाऊंट ओपन
त्यामुळे ट्विटरला आता स्वदेशी कू पर्याय ठरतोय का, किंवा केंद्रातील सरकार ट्विटरला पर्याय देण्याचा प्रयत्न करतंय का अशी चर्चा सुरु आहे. शेतकरी आंदोलनावर सातत्याने टीका करणारी आणि सरकारचे समर्थन करणारी अभिनेत्री कंगना रनौतनेही कू वर अकाउंट खोललं आहे. तीने अशी माहिती देताना ट्विटरला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना रनौत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली की, "ट्विटर आता तुझा टाईम संपला आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकर कू अॅपवर शिफ्ट होत असून या संदर्भातील माझे अकाउंट डिटेल शेअर करेन. स्वदेशी कू अॅपचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे."
काय आहे कू?
कू हे एक ट्विटर प्रमाणेच पण स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. हे वेबसाइटवर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ट्विटरप्रमाणे यावरही आपण आपले विचार मांडू शकतो. यात आपले मत मांडण्यासाठी 400 शब्दांची मर्यादा आहे. इथेही आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपण फॉलो करु शकतो.
आपल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपण कू वर अकाउंट काढू शकतो तसेच साइन इन करतानाही मोबाईलचा वापर करु शकतो. महत्वाचं म्हणजे यूजर्स आपले फेसबुक, लिंक्ड इन, यूट्यूब तसेच ट्विटर अकाउंट कू शी लिंक करु शकतात. ट्विटर प्रमाणे यावरही हॅशटॅगचा वापर करता येतो. कू वर पोस्ट शेअर करताना ती ऑडिओ अथवा व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करता येते. आपल्या पोस्टमध्ये इतरांनाही टॅग करता येते.
कू या अॅपचा विकास बॉम्बीनेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या बेगळुरुतील कंपनीने केला आहे. याची सुरुवात 2015 साली करण्यात आली आहे. कू ने केंद्र सरकारचा आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज पुरस्कार जिंकला आहे. या अॅपच्या निर्मात्याचं नाव Aprameya Radhakrishna असं आहे.
कंगनाची टिवटिव थांबणार! ट्विटरला रामराम करत 'कू' अॅपवर अकाऊंट उघडणार