नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी व्होडोफोन-आयडीयाने आपल्या काही सेवांच्या नवीन दरांची रविवारी घोषणा केली. यानुसार, तीन डिसेंबरपासून त्यांच्या विविध कॉल्स आणि डाटा प्लॅनमध्ये 42 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मागील चार वर्षात पहिल्यांदाच कंपनीने दरवाढ केली आहे. यासोबतच दुसऱ्या नेटवर्कवर जाणाऱ्या कॉल्सचे दर 6 पैसे प्रति मिनिट इतके करण्यात येणार आहे. व्होडोफोन-आयडीया नंतर एअरटेलनेही आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. एअरटेलही तीन डिसेंबरपासून आपल्या सेवांमध्ये दरवाढ करणार आहे.


कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, की "दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी व्होडाफोन-आयडीय आपल्या सेवांच्या नवीन दरांची घोषणा करत आहे. हे नवीन दर देशात तीन डिसेंबरपासून लागू होतील. कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी दोन दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेच्या नवीन योजनांची घोषणा केली आहे. त्यानुसार नवीन प्लॅन पूर्वीपेक्षा 41.2 टक्क्यांनी महाग आहेत. कंपनीने अमर्यादित मोबाइल कॉल्स आणि डेटा ऑफरच्या दरात वाढ केली असून काही नवीन प्लॅनही दिले आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तीन डिसेंबरपासून सर्व जुन्या प्लॅन्सऐवजी नवीन योजना लागू केल्या जातील. या निर्णयावर बाजाराची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर, कंपनी दुरुस्ती किंवा नवीन योजना देऊ शकते.

कंपनीने वार्षिक प्लॅन्समध्ये 41.2 टक्के वाढ केली आहे. पूर्वी 1,699 इतका रुपयांच्या प्लॅनसाठी आता 2,399 रुपये मोजावे लागणार आहे. दररोज दीड जीबी डेटा अन् 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनची किंमत सध्या 458 रुपये इतकी होती. त्यात 31 टक्के वाढ झाली असून आता त्यासाठी 599 रुपये द्यावे लागणार आहे. सोबतच 199 रुपयांचा प्लॅन आता 249 रुपयांना झाला आहे. कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. कंपनीवर सध्या 1.17 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. सप्टेंबर तिमाहित कंपनीला 50,921 कोटींचा तोटा झाला आहे.

व्होडोफोन-आयडीया आर्थिक संकटात - 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑक्टोबरला दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे व्होडाफोन-आयडिया कंपनी प्रचंड अडचणीत आली आहे. व्होडाफोनचे सीईओ निक रीड यांनी काही दिवसांपूर्वी केलेले एक वक्तव्य वादग्रस्त ठरले. भारतातील टेलिकॉमसंबंधी शुल्क आकारणी अशीच सुरु राहिली तर भविष्यात आम्हाला तेथे व्यवसाय करणे कठीण होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्र सरकारने नापसंती व्यक्त केल्यानंतर रीड यांनी 24 तासांतच सरकारची माफी मागितली.

संबंधित बातम्या : -

सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्विटर अकाउंट्स डिलीट होणार

OnePlus कंपनीला भारतात 5 वर्ष पूर्ण; 7 हजारापर्यंत मिळू शकते सवलत

Free Calling | मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, 'या' कंपन्यांकडून फ्री कॉलिंगची घोषणा | ABP Majha