मुंबई : मोटारसायकलची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेच्या हार्ले डेविडसन कंपनीने भारतातील उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मागील वर्षी ग्लोबल री-स्ट्रक्चरिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली होती. त्याअंतर्गत ज्या देशात कंपनीची विक्री आणि फायदा कमी आहे, त्या देशांमधील व्यवसाय बंद करायचा होता. भारतामधील उत्पादन आणि विक्री बंद करणं हे याच प्लॅनचा भाग आहे.
मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीत 22 टक्क्यांची घसरण झाली होती. अशा परिस्थितीत तोट्यात असलेले बाजार सोडून अमेरिकेतील आपल्या व्यवसायावर कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. 2019 मध्ये हार्ले डेविडसनने केवळ 2676 बाईकीची विक्री केली होती. इतकंच नाही तर यामध्येही 65 टक्के वाटा 750 सीसी बाईकचा आहे, ज्यांची असेम्ब्लिंग हरियाणातच केली जाते.
4 वर्षात 7 परदेशी कंपन्यांचा भारतीय बाजाराला रामराम
गेल्या चार वर्षात भारतातील आपला गाशा गुंडाळणारी हार्ले डेविडसन ही सातवी परदेशी ऑटो कंपनी आहे. याआधी जनरल मोटर्स, फिएट, Ssangyong, स्कॅनिया, MAN आणि UM Motorcycles या कंपन्यांनी भारतीय बाजाराला रामराम केला आहे.
10 वर्षात केवळ 27 हजार बाईकची विक्री
हार्ले डेविडसनची बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये मोडते आणि भारतात मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे कंपनीने भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हार्ले डेविडसनने एक दशकापूर्वी भारतीय बाजारात प्रवेश केला होता. पण या दहा वर्षांत केवळ 27 हजार बाईकचीच विक्री झाली आहे. तर याच सेगमेंटमधील रॉयल एनफिल्ड ही कंपनी एका महिन्यात एवढ्या बाईकची विक्री करते.
70 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा?
हार्लेच्या या निर्णयामुळे भारतातील कंपनीच्या जवळपास 70 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. तर कंपनीने भारतातील व्यवस्थापकीय संचालक संजील राजशेखरन यांना कंपनीने सिंगापूरला ट्रान्सफर केलं आहे. तिथे ते आशियाचे प्रमुख अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
हार्ले डेविडसनच्या एकूण विक्रीचा केवळ पाच टक्के भागच भारतीय बाजारातून येतो. सध्या हार्लेचा हरियाणामध्ये एक असेम्ब्ली प्लांट आहे. तसंच कंपनी पूर्णत: तयार बाईक भारतात आयातही करते. हरियाणामधील असेम्ब्ली प्लांट ऑगस्ट 2009 मध्ये सुरु करण्यात आला होता. इथेच कंपनीने आपली पहिली डीलरशिप नियुक्त केली होती.