नवी दिल्ली: पासपोर्ट बनविण्याच्या नियमात नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मोदी सरकारनं अशा कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी अनेक ठोस पावलं उचलणं सुरु केलं आहे. 2017 साली बायोमेट्रिक माहितीनं परिपूर्ण असलेलं ई-पासपोर्ट लाँच केलं जाणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालय लवकरच चिप असलेलं ई-पासपोर्ट आणणार आहे. ज्यामुळे पासपोर्टसंबंधी माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं खात्री केली जाणार आहे.
ई-पासपोर्टमुळे डेटा सुरक्षित राहू शकेल आणि नकली पासपोर्ट तयार करणं याला पायबंद बसेल. ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप असणार आहे. पासपोर्टच्या डेटा पेजमध्ये जी माहिती असेल तीच माहिती चिपमध्येही असणार आहे. या चिपमुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना पासपोर्टचा चुकीचा वापर करणाऱ्यांबद्दल माहिती मिळणार आहे. ई-पासपोर्टनंतर पूर्णपणे डिजिटल पासपोर्ट सेवा सुरु करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. जे मोबाइलमध्येही तुम्ही ठेऊ शकता.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी ई-पासपोर्टशी निगडीत एका प्रश्नाला उत्तर देताना पराराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितलं होतं की, 'सरकारनं ई-पासपोर्टसाठी मंजुरी दिली आहे.'
दरम्यान, आठ वर्षापूर्वी यूपीए सरकारच्या काळात ई-पासपोर्टची घोषणा करण्यात आली होती. अखेर 2017 साली ई-पासपोर्ट लाँच करण्यात येणार आहे.