बोस्टन : हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक आणि गुगलने भूकंपानंतर येणाऱ्या तीव्र झटक्यांच्या जागांची योग्य भविष्यवाणी करण्यासाठी एक मॉडेल विकसित केलं आहे. मशिन लर्निंग प्रोसेसवर आधारित हे मॉडल तयार करण्यासाठी हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी गुगलसोबत काम सुरू केलं आहे.


या नव्या तंत्रज्ञानामुळे भूकंपानंतर येणाऱ्या झटक्यांमुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यास मदत होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाबद्दल बोलताना वैज्ञानिकांनी सांगितलं की, आम्ही गुगल मशिन लर्गिंग तज्ज्ञांसोबत डीप लर्निंग प्रोसेसवर काम सुरू केलं आहे. यामुळे भूकंपानंतर येणाऱ्या झटक्यांच्या ठिकाणांची माहिती उपलब्ध होणार आहे. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट करणाऱ्या फाबे डेविरी यांनी गुगलच्या ऑफिशिअल ब्लॉग पोस्टवर याबाबत लिहिलं आहे.


मोठ्या भूकंपानंतर लहान-मोठे अनेक तीव्र किंव कमी क्षमतेचे झटके येतात. अनेकदा या झटक्यांमुळे बचावकार्यात अनेक अडचणी येतात. तसेच अनेकदा या झटक्यांमुळे मोठी वित्तहानी आणि मनुष्यहानीही होते. भूकंपानंतरच्या या झटक्यांची वेळ आणि क्षमता याचा अंदाज वर्तवण्यासाठी वैज्ञानिक पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. मात्र या पारंपरिक पद्धतीने या झटक्यांचा योग्य अंदाज वर्तवणे आजवर शक्य झालेलं नाही.


मात्र आता हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी आणि गुगल एकत्रितपणे आर्टिफशिअल इंटेलिजेंस प्रोग्राम तयार करत आहेत. जगभरातील 118 भूकंपांचा अभ्यास करून त्याआधारे मोठ्या भूकंपानंतर येणाऱ्या झटक्यांची माहिती मिळणे शक्य होणार आहे.


या नव्या तंत्रज्ञानामुळे भूकंपानंतरच्या झटक्यांची माहिती आणि ठिकाणाची योग्य माहिती मिळाल्यास बचावकार्यात येणारे अडथळे कमी होणार आहेत. तसेच लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठीही याची नक्कीच मदत होणार आहे.