मुंबई : गूगलने ‘अँड्रॉईड 8.1 ओरियो’ ऑपरेटिंग सिस्टमनंतर नवं व्हर्जन लॉन्च केले आहे. ‘अँड्रॉईड पाय’ असे या नव्या व्हर्जनचे नाव आहे. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ‘अँड्रॉईड पी’ असे नाव ठेवले होते, मात्र त्यात बदल करुन ‘अँड्रॉईड पाय’ असे नाव ठेवण्यात आले आहे. या नव्या व्हर्जनमध्ये अनेक आर्टिफिशियल इंटेलिजियन्स फीचर्स देण्यात आले आहेत.


‘अँड्रॉईड ओरियो’च्या तुलनेत ‘अँड्रॉईड पाय’मध्ये नवे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं फीचर्स म्हणजे जेस्चरवर आधारित नेव्हिगेशन सिस्टम हे फीचर आहे. ‘आयफोन एक्स’च्या इंटरफेसची छाप या नव्या व्हर्जनमध्ये दिसते.

पिक्सेल डिव्हाईस वापरणाऱ्यांसाठी सर्वात आधी ‘अँड्रॉईड पाय’ उपलब्ध असेल. त्यामुळे ते यूजर्स सेटिंगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करु शकतात. तसेच, अँड्रॉईड बिटा प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या सोनी, शाओमी, एचएमडी ग्लोबल, व्हिवो, वनप्लस यांसारख्या कंपन्यांच्या डिव्हाईसमध्ये लवकरच हे नवं व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात येईल.

या नव्या अपडेटची साईज 1 जीबी ते 1.2 जीबी पर्यंत असेल. त्यामुळे अपडेटआधी तुमच्या हँडसेटमध्ये किती जागा रिकामी असेल, हेही तुम्हाला पाहावे लागणार आहे.

स्वीट्सच्या नावांची परंपरा

अँड्रॉइड प्रणालीच्या विविध आवृत्त्यांना आजवर जगाच्या विविध भागात लोकप्रिय असणारे गोड पदार्थ, चॉकलेट्स, डेझर्टस् यांची नावे देण्यात आली आहेत. यात इंग्रजी अल्फाबेटनुसार पहिल्या दोन आवृत्तींना अल्फा आणि बीटा ही नाव देण्यात आली. त्यानंतर सी पासून कपकेक (1.5), डोनट (1.6), इक्लेअर्स (2.0, 2.1), फ्रोयो (2.2, 2.2.3), जिंजरब्रेड (2.3, 2.3.7), हनीकोंब (3.0 आणि 3.2.6), आईस्क्रिम सँडविच (4.0, 4.0.4), जेली बीन (4.1, 4.3.1), किटकॅट (4.4, 4.4.4 आणि 4.4W, 4W.2), लॉलिपॉप (5.0 आणि 5.1), मार्शमेलो (6.0) आणि नोगट (7.0), ओरियो (8.0) आणि आता पाय (9) ही आवृत्ती लॉन्च करण्यात आली आहे.