नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया कंपन्या आणि भारत सरकार यांच्यात नियमांचे पालन करण्यावरुन वाद-विवाद सुरु आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी केंद्राच्या नव्या नियमावलीचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियमानुसार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. मात्र, ट्विटरने अद्याप नियमांनुसार कारवाई केली नाही.


सूत्रांच्या माहितीनुसार, प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या इंटरमिजिएट मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता 2021 च्या नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क व्यक्ती आणि तक्रार निवारण अधिकारी यांचे तपशील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवण्यात  आले आहेत.


या माहितीनुसार, कू, शेअरचॅट, टेलिग्राम, लिंक्डइन, गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप इत्यादी प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेही नवीन नियमांच्या आवश्यकतेनुसार मंत्रालयाला तपशील सांगितला आहे.


सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार ट्विटर अद्यापही नियमांचे पालन करण्यास तयार नाही. काल सरकारच्या कडक प्रतिक्रियेनंतर ट्विटरने काल रात्री उशिरा एक निरोप पाठविला, ज्यामध्ये नोडल संपर्क व्यक्ती आणि तक्रार अधिकारी या नात्याने भारतातील एका लॉ फर्ममध्ये काम करणाऱ्या वकिलाची माहिती पाठवण्यात आली गेली.


नियमांनुसार महत्त्वाच्या सोशल मीडिया कंपन्यांनी नियुक्त केलेले अधिकारी हे त्यांचे कर्मचारी असणे आवश्यक आहे. शिवाय ते भारतात राहात असले पाहिजेत. ट्विटरने अद्याप मुख्य अनुपालन अधिकाऱ्याचा तपशील मंत्रालयात पाठविला नाही.


काय होती सरकारची नियमावली?



  • 25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारनं सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली जाहीर केली.

  • त्यानुसार या कंपन्यांना भारतात एका तक्रार निवारण अधिकाऱ्याची आणि एका विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक बंधनकारक आहे.

  • तक्रार दाखल झाल्यानंतर 24 तासात त्याची दखल घेतली जावी, 15 दिवसांत त्याचा निवाडा व्हावा

  • मुख्यालयं विदेशात असली तरी केंद्र सरकारच्या व्यवहारासाठी एक अधिकृत पत्ता देशात असावा



भारतासारखा प्रचंड लोकंसख्येचा देश म्हणजे या कंपन्यांचं मोठं मार्केट आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंतची जी आकडेवारी आहे त्यानुसार व्हॉटसअपचे भारतात 53 कोटी युझर आहेत, यु टुयबचे 44 कोटी, फेसबुकचे 41 कोटी युझर आहेत तर इन्स्टाग्रामचे 21 कोटी. त्यामुळे आपल्या व्यावहारिक गणिताचा विचार करायचा की स्वातंत्र्यासाठी झगडायचं हा विचार कंपन्यांना करावा लागणार आहे.