मुंबई : कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच या व्हायरसची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देशात अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा परिणाम देशाती सण-उत्सवांवरही झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच जीप इंडियाने हटके अंदाजात गणेशोत्सव साजरा केला असल्याचं समोर आलं आहे. जीप इंडिया कंपनीचा प्लांट पुण्यातील रांजणगाव येथे आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. त्यामुळे जीप कंपास एसयूव्हीने निर्णय घेतला की, आपल्या एसयूव्ही गाड्यांच्या मदतीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देता येतील. जीप कंम्पासच्या 122 यूनिट्सचा वापर एक गणपतीची प्रतिमा तयार करण्यासाठी करण्यात आला.





कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता कंपनीचे कर्मचाऱ्यांनी सर्व काळजी घेऊन ही प्रतिमा साकारली आणि यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलं. एक-एक एसयूव्ही गाडी बाहेर काढून गणपतीची प्रतिमा तयार करण्यात आली.


एसयूव्ही गाड्यांच्या मदतीने तयार करण्यात आलेली गणपतीची प्रतिमा 162 फूच लांब, 185 फूट रूंद होती आणि या गाड्यांना आणण्यासाठी 8 ड्रायव्हर्सनी काम केलं होतं. असं करण्यासाठी आणि एक-एका रंगाच्या गाड्या व्यवस्थित लावून गणपतीची प्रतिकृती साकारण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकूण 50 तास लागले. जीप कंपास कंपनीच्या ग्राहकांची एक लोकप्रिय गाडी आहे. आता ही कंपनी एसयूव्हीसोबत आपल्या पोर्टपोलियोचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत.


दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडला. असं असलं तरीही गणेशभक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करत आणि गणेशोत्सव साजरा केला गेला. अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सवाऐवजी आरोग्य उत्सव साजरा केला. तसेच अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या :