Google Doodle : गुगलने डूडल बनवून भारतीय कुस्तीपटू गामा पैलवान (Gama Pehalwan) अर्थात ‘द ग्रेट गामा’ यांचा सन्मान केला आहे. 22 मे 1878 रोजी या महान कुस्तीपटूचा जन्म झाला होता. गामा पैलवान असे त्यांचे नाव होते. आज त्यांचा 144वा वाढदिवस असून, त्यानिमित्त गुगलने खास डूडलही बनवले आहे. गामा पैलवानबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या 52 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीही कोणाला हरवले नाही. गामा पैलवान यांच्या नावाचा इतका दबदबा होता की, त्यांचे नाव ऐकताच मोठमोठे पैलवान मागे हटायचे.
गामा पैलवान यांचा जन्म पंजाब प्रांतातील जब्बोवाल गावात झाला होता. या भागाला तेव्हा ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखले जात होते. गामा पैलवान यांचे बालपण अडचणींनी भरलेले होते. वडील आणि आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुस्तीपटू असलेल्या काकांसोबत आयुष्य घालवले. गामा पैलवान यांना ग्रेट गामा म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे खरे नाव गुलाम मोहम्मद बक्श होते.
अवघ्या 10व्या वर्षी कुस्तीची सुरुवात
गामा यांचे वडील मुहम्मद अझीझ बक्श हे देखील कुस्तीपटू होते. गामा यांनी वयाच्या 10व्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली होती. गामा पैलवान यांनी सुरुवातीला पंजाबमधील प्रसिद्ध कुस्तीपटू माधो सिंह यांच्याकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या 10 व्या वर्षी एका स्पर्धेत भाग घेतला आणि 400 लोकांमध्ये आपले जागा निर्माण करून अव्वल स्थान पटकावले. गामा पैलवान यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर कुस्तीपटूंना पराभूत करून भारताची मान अभिमानाने उंचावली होती.
अनेक दशके आणि कारकिर्दीत जवळपास पाच हजार सामने खेळूनही ते कायम अपराजित राहिले. 1947 पर्यंत गामा पैलवान यांनी आपल्या कौशल्याने संपूर्ण जगात भारताचे नाव रोशन केले होते. मात्र, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी गामा पैलवान आपल्या कुटुंबासह लाहोरला गेले. गामा पैलवान प्रशिक्षणादरम्यान दररोज 5000 स्क्वॅट्स आणि 3000 पुशअप्स करायचे.
गुगल डूडलमध्ये काय खास?
आज (22 मे) गामा पैलवान यांचा 144वा वाढदिवस आहे. हा खास दिवस साजरा करण्यासाठी गुगलने त्यांना डूडलद्वारे शुभेच्छा दिल्या. या डूडलमध्ये त्यांच्या उजव्या हातात चांदीची गदा दिसत आहे. ही चांदीची गदा त्यांना प्रिन्स ऑफ वेल्स यांनी दिली होती.
हेही वाचा :
Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेश