फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाईन पुस्तक विकणारी एक स्टार्टअप म्हणून झाली होती. मात्र अकरा वर्षांनंतर या कंपनीने यशाचं शिखर गाठत विक्रीचे मोठेमोठे विक्रम केले.
कंपनीची स्थापना कशी झाली?
अमेरिकेतील ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनचे दोन माजी कर्मचारी सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांची भेट 2005 साली दिल्लीतील आयआयटीमध्ये झाली. दोघांनीही अमेझॉनमध्ये इंटर्नशीप केली होती. दोघांचे विचारही मिळतेजुळते होते, ज्यानंतर ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी फ्लिपकार्ट या कंपनीची स्थापना केली.
या कंपनीकडून ग्राहक ऑनलाईन पद्धतीने पुस्तकं खरेदी करतील, हा कंपनीचा उद्देश होता. ही पुस्तकं ग्राहकांच्या घरपोहोच दिली जाणार होती.
सुरुवातीला संथ प्रतिसाद
पहिल्या वर्षी या कंपनीला कुणीही गांभीर्याने घेतलं नाही. ही पद्धत आपल्याकडे चालणार नाही, असं लोकांचं म्हणणं होतं. कारण, भारतीय व्यक्ती प्रत्येक वस्तू स्वतः दुकानात जाऊन पारखून घेण्यात विश्वास ठेवत होता. पहिल्या वर्षी कंपनीला केवळ 20 ऑर्डर मिळाल्या.
सुरुवातील दोन ते तीन वर्ष संघर्ष करत ही कंपनी चालूच राहिली. 2010 हे वर्ष कंपनीसाठी टर्निंग पॉईंट ठरलं, जेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह मोबाईल विक्रीही कंपनीने सुरु केली. यानंतर कंपनीला कधीही मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. दिवसेंदिवस कमाई करत ही कंपनी भारतातली ऑनलाईन खरेदीचा पर्याय बनली.
या कंपनीचं यश पाहता इतर कंपन्यांनीही या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि यश मिळवलं. याच काळात भारताचा ई-कॉमर्स व्यवसाय वाढून 30 अब्ज डॉलरवर पोहोचला आणि 2026 पर्यंत हा 200 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या प्रवासात फ्लिपकार्टने ईबेपासून ते टेनसेंट, मायक्रोसॉफ्ट आणि सॉफ्टबँक यांच्याकडून गुंतवणुकीसाठी पैसा घेतला. बंगळुरुत दोन खोल्यांच्या छोट्याशा घरामध्ये सुरु झालेल्या फ्लिपकार्टच्या मुख्यालयात सध्या 6800 कर्मचारी काम करतात. याशिवाय देशभरात कंपनीचे कार्यालय आहेत.