मुंबई : फेसबुकने बनावट बातम्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय या समस्येला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. कंपनीने याबाबत सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन बनावट बातम्यांपासून सावध राहण्याविषयी जनजागृती अभियान सुरु केलं आहे.


फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बनावट बातम्याही प्रसिद्ध केल्या जातात. ज्यामुळे वाचकांची दिशाभूल होते. त्यामुळे फेसबुकनेच यासाठी आता पुढाकार घेऊन बनावट बातम्यांविरोधात मोहिम सुरु केली आहे. व्हॉट्सअॅपही फेसबुकच्याच मालकीची कंपनी आहे.

फेसबुककडून बनावट बातम्या रोखण्यासाठी काम सुरु करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. युझर्सना बनावट बातम्या कशा ओळखायच्या याविषयी टिप्सही देण्यात येणार आहेत. अनेक वृत्त बनावटही असू शकतात. त्यामुळे वाचकांनी बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी, असं आवाहन कंपनीने केलं आहे.

बनावट बातम्या कशा ओळखाल?

  1. खोट्या किंवा बनावट बातम्या या मिसलीडिंग किंवा कॅची हेडलाईन्सच्या असतात. या बातम्यांच्या हेडिंगमध्ये ‘शॉकिंग’, ‘अनबिलिव्हेबल’ अशा शब्दांचा वापर केला जातो, ज्यामुळे वाचक कसलाही विचार न करता त्या बातमीवर क्लिक करतात. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती बातमी दुसरीकडे कुठे आहे का, याची पडताळणी करावी.

  2. यूआरएल तपासून पाहा : बनावट किंवा फेक बातम्या ओळखण्यासाठी तुम्ही यूआरएल म्हणजे बातमीचं इंग्लिश टायटल पाहू शकता. अनेक वेबसाईट्स अधिकृत वेबसाईट्सच्या बातम्यांचा यूआरएल घेऊन त्यामध्ये जरासा बदल करतात.

  3. बातमीचा स्रोत पाहा : बातमीच्या सत्यतेबद्दल पडताळणी करण्यासाठी बातमीचा स्रोत तपासून पाहू शकता.

  4. बातम्यांचा फॉरमॅट : फेक किंवा बनावट बातम्यांचा फॉरमॅट साधारणपणे वेगळा दिसून येतो. ज्यामध्ये अनेक व्याकरणाच्या चुकाही तुम्हाला दिसून येतील.

  5. बातमीचा फोटो : फेक बातम्यांमध्ये वाचकांना संभ्रमित किंवा दिशाभूल करणाऱ्या फोटोचा वापर केला जातो.