न्यूयॉर्क : केम्ब्रिज अॅनालिटिका डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अमेरिकन संसद अर्थात अमेरिकन काँग्रेससमोर हजेरी लावली. यावेळी 44 सीनेटर्सनी (खासदार) झुकरबर्गवर वैयक्तिकपणे प्रश्नांचा भडीमार केला.


प्रत्येक सीनेटरला 5-5 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी 44 सीनेटर्सनी आपापला वेळ घेत, झुकरबर्गवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी झुकरबर्ग चांगलाच घाबरलेला दिसला.

झुकरबर्गला विचारलेल्या प्रश्नांची यादी मोठी आहे. तरीही सीनेट सदस्यांच्या काही प्रश्नांवर मार्क झुकरबर्ग अतिशय भांबावलेला दिसला. उत्तरं देताना तो मध्येच थांबत होता, गोंधळत होता. इतकंच नाही तर तो सतत पाणी पितानाही दिसला.

व्हायरल सत्य : BFF हिरव्या रंगात पोस्ट झालं तरच अकाऊंट सुरक्षित?

मार्क झुकरबर्गला विचारलेले प्रश्न

1. - 2016 च्या अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकने जाणीवपूर्वक विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फायदा मिळवून दिला?

2. - रशिया आणि चीनच्या सरकारकडे फेसबुकचा डेटा जमा होत असल्याचं समजतं. यामध्ये किती तथ्य आहे?

3. - फेसबुकला आपल्या युझर्सच्या परवानगीची गरज वाटत नाही का? तुम्ही युझर्सच्या डेटावरुन पैसे कमावता आणि सांगता की युझर स्वत:च त्यांच्या डेटाचे मालक आहेत, हे कसं शक्य आहे?

4. - फेसबुक युझर्सची कोणत्या प्रकारची माहिती जमा करत आहे आणि का?

5. - डेटा लीकबाबत फेसबुक मागील एक दशकापासून संशयाच्या भोवऱ्यात आहे. सातत्याने माफी मागण्याशिवाय तुम्ही यासाठी आणखी काही का केलं नाही?

6. - फेसबुकवर हेट स्पीच आणि ट्रोलिंगबाबत तुम्ही गंभीर का नाही? अशा पोस्टमधून तुम्हाला जास्त पैसे मिळतात, असं तर नाही ना?

7. - कोणत्या प्रकारचा डेटा तुमच्या सर्व्हरवर स्टोअर करत आहात?

8. - हिडन अॅप्सद्वारे तुम्ही युझर्सची ब्राऊजिंग हिस्ट्री ट्रॅक करता का?

9. - युझर्सची टेक्स्ट हिस्ट्री, अॅक्टिव्हिटी आणि डिव्हाईस लोकेशनही तुम्ही स्टोअर करता?

10. - राजकीय विचारसरणीनुसार तुम्ही युझर्सना त्यांची सामग्री पुरवता. पण युझर्सच्या आवडीच्या माध्यमातून ते पाहत असलेली सामग्री तुम्ही नियंत्रित करता का?

भारतातील निवडणुकांवर प्रभाव नाही
भारतात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही झुकरबर्गने दिली. "भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकचा प्रभाव नसेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत," असं झुकरबर्ग म्हणाला.

भारतातील निवडणुकांत फेसबुकचा हस्तक्षेप नसेल: झुकरबर्ग

सिनेटर्सच्या प्रश्नावर उत्तर देताना झुकरबर्ग म्हणाला, "2018 हे वर्ष निवडणुकांसाठी महत्त्वाचं आहे. यावर्षी अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. तर भारत, पाकिस्तान, ब्राझील यासारख्या देशांमध्येही निवडणुका आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये फेसबुकचा हस्तक्षेप होणार नाही,यासाठी आम्ही प्रयत्न करु."

झुकरबर्गचा माफीनामा
दरम्यान, झुकरबर्गने डेटा लीकप्रकरणी सीनेटर्ससमोर जाहीर माफी मागितली. केम्ब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेतील निवडणुकीसाठी 8.7 कोटी फेसबुक युजर्सची खासगी माहिती मिळवली. मात्र हे रोखण्यात आम्ही कमी पडलो, असं झुकरबर्ग म्हणाला.

झुकरबर्गने यापूर्वीही माफी मागितली होती. करियरमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचं तो म्हणाला. "आम्ही आमच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकलो नाही, ती आमची मोठी चूक होती," असं झुकरबर्ग म्हणाला.

वादामागे कोण?
फेसबुक डेटा स्कॅण्डलमध्ये इंग्लंडमधील राजकीय संशोधन संस्था केम्ब्रिज अॅनालिटिका असल्याचा आरोप आहे. या संस्थेने फेसबुकवरील जवळपास 9 कोटी युजर्सचा डेटा चोरुन, तो अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत वापरल्याचा आरोप आहे.

भारतासह आशियाई देशातही डेटाचोरी?
केम्ब्रिज अॅनालिटिकाने केवळ अमेरिकेतीलच युझर्सची डेटाचोरी केली नाही तर त्यांनी आपले पाय आशियातही पसरवले आहेत. भारत, इंडोनेशिया, फिलिपाईन्ससह ऑस्ट्रेलियातही डेटाचोरी करण्यात आली आहे.

8 कोटी 70 लाख फेसबुक युझर्सच्या डेटाचा गैरवापर!

फेसबुकविरोधात ऑस्ट्रेलियाची पावलं
डेटा स्कॅण्डलमुळे ऑस्ट्रेलियाने फेसबुकविरोधात चौकशी सुरु केली आहे. फेसबुकची औपचारिक चौकशी सुरु असल्याची माहिती, ऑस्ट्रेलियाचे प्रायव्हसी कमिशनने दिली.  ऑस्ट्रेलियातील 3 लाख फेसबुक युजर्सचा डेटाचोरी झाल्याचा आरोप आहे.