मुंबई : तुम्ही सतत जर मोबाईल फोन आणि त्यातही स्मार्टफोन वापरत असाल तर त्यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याची भीती आहे. आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक गिरीश कुमार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती दिली आहे.


प्राध्यापक गिरीश कुमार म्हणाले की, "सतत चार वर्ष दरदिवशी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलल्याने श्रवण शक्ती क्षीण होते. तसंच दृष्टीवरही परिणाम होतो. याशिवाय 30 ते 35 वर्ष वय असलेल्यांमध्ये मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढते. यामध्ये अल्झायमर आणि पार्किन्सन यांसारख्या आजारांचा समावेश आहे."

फाईल फोटो

"आज जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचं प्रमाण 400 टक्क्यांनी वाढतं. त्यामुळे मोबाईलचा अति वापर करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं ते म्हणाले.

"मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाने चिमण्या, मधमाशा आणि फुलपाखरुसह इतर सजीव आणि झाडांची हानीकारक परिणाम होत आहे," असं प्राध्यापक गिरीश कुमार म्हणाले.

"स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. स्मार्टफोन शरीर आणि कानापासून दूर ठेवणंही अतिशय गरजेचं आहे. कारण स्मार्टफोनमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाने मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता 400 पटींनी जास्त आहे. लहान मुलं आणि तरुणांवर किरणोत्सर्गाचा प्रभाव लवकर होतो. तसंच यामुळे पुरुषत्वावरही परिणाम होतो," असं प्राध्यापक कुमार यांनी सांगितलं.



परंतु यासाठी स्मार्टफोनचा वापर बंद करणं हा पर्याय नसून त्यामधून बाहेर निघणाऱ्या किरणोत्सर्गावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यावर काम करत असल्याचंही गिरीश कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, प्राध्यापक गिरीश कुमार यांनी अलीगड मुस्लीम विद्यापीठातून 1978 मध्ये बीएससी इंजिनिअरिंगीची पदवी घेतली आहे.