Elon Musk Takeover Twitter : टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी विकत घेतली आहे. 44 अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला आहे. एलॉन मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ट्विटर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी संध्याकाळी उशिरा ही ऑफर स्वीकारली आहे. ट्विटरवरून माहिती देताना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले आहे की मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरचा करार केला आहे. 


दरम्यान, टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचे आणखी एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात ट्विटरसोबतचा त्यांचा करार अंतिम होण्याची शक्यता होती. सोमवारी संध्याकाळी मस्क यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये लिहीले होते की, 'मला आशा आहे की त्यांच्या सर्वात वाईट टीका अजूनही ट्विटरवर राहतील, कारण यालाच बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणतात.' त्यांचे हे ट्विट वेगाने व्हायरल झाले. 






एलॉन मस्क मागील काही काळापासून सतत ट्विटरचे शेअर्स खरेदी करत होते. त्यानंतर त्यांनी थेट ट्विटरच्या संचालक मंडळाकडून ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. एलॉन मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डॉलर दराने ट्विटर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सध्या, हा आकडा 1 एप्रिल 2022 च्या स्टॉकच्या बंद दरापेक्षा 38 टक्के अधिक आहे. त्यावेळी, ट्विटरमध्ये गुंतवणूक केलेले सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वलीद बिन तलाल अल सौद यांनी ट्विट करून एलॉन मस्क यांची ऑफर नाकारली होती.


मात्र, त्यानंतर बोर्डाला ही ऑफर पसंत पडली आणि बोर्डाने ऑफर मान्य केली. त्यामुळे एलॉन मस्क आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. या संदर्भातील पूर्ण प्रक्रिया या वर्षात पूर्ण होईल. दरम्यान, सध्याचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे ट्विटरचे सीईओ म्हणून कायम राहतील की यामध्ये काही बदल केले जातील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :