Dangerous Apps : डिजिटल युगात, आपली बहुतेक कामे ऑनलाईन विशेषतः अ‍ॅप्सद्वारे केली जातात. हेच कारण आहे की, बहुतेक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हांला वेगवेगळे अनेक अ‍ॅप्स आढळतील. यापैकी काही अ‍ॅप्स वैध स्रोत म्हणजेच सुरक्षित कंपनीचे आहेत, ज्यामुळे कोणताही धोका नसतो. मात्र, असेही अनेक अ‍ॅप्स आहेत जे आपल्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरतात. आम्ही तुम्हांला अशा काही अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या स्मार्टफोनसाठी आणि तुमच्या गोपनीयतेसाठी धोकादायक ठरु शकतात आणि हे अ‍ॅप्स लगेच काढणेच योग्य ठरेल.


1. फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप (Editing App)
सध्या बहुतेक लोक त्यांचे फोटो सुधारण्यासाठी आणि एडिट करण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करतात. यावेळी तुम्हांला लक्षात ठेवायला हवे की फार कमी फोटो एडिटिंग अ‍ॅप सुरक्षित आहेत. वेळोवेळी असे अनेक फोटो अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवरून बॅन केले जातात. हे अ‍ॅप्स तुमच्या गोपनीयतेसाठी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे त्यांना फोनमधून काढून टाकणे शहाणपणाचे आहे. आता बऱ्याच फोनमध्येच एडिटिंगचे अनेक पर्याय उपलब्ध असतात.


2. क्लीनर अ‍ॅप (Cleaner App)
फोनचे तापमान कमी करण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी, नको असलेल्या फाईल्स काढून टाकण्यासाठी आणि कॅशे मेमरी (Cache Memory) साफ करण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या क्लीनर अ‍ॅप्सचा वापर करतात. परंतु या अ‍ॅप्सपासून बरेच धोके देखील आहेत. अनेक वेळा भारत सरकारने अशा अ‍ॅप्सवर बंदीही घातली आहे. यातील बहुतांश अ‍ॅप्स चायनीज आहेत. यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.


3. कीबोर्ड अ‍ॅप (Key Bboard App)
स्टायलिश टायपिंग अनुभवासाठी अनेक लोक त्यांच्या फोनमध्ये विविध प्रकारचे कीबोर्ड अ‍ॅप्स इंस्टॉल करतात. असे अ‍ॅप्स फोनमध्ये न ठेवणेच चांगले आहे. यामुळे तुम्हांला मोठा धोका निर्माण होतो. हे अ‍ॅप्स टाईप करताना तुमचा बँकिंग पासवर्ड आणि काही इतर वैयक्तिक माहिती गोळा करू शकतात.


4. फ्लॅश लाइट अ‍ॅप (Flashlight App)
बरेच लोक त्यांच्या फोनमध्ये फ्लॅशलाईटसाठी अ‍ॅप्स डाउनलोड करतात. असे अ‍ॅप्सही खूप धोकादायक असतात. ते तुमच्या फोनवरून अनेक वैयक्तिक माहिती चोरतात. बहुतेक फोन इनबिल्ट फ्लॅशलाईटचा पर्याय उपलब्ध आहे.


5. मोफत अँटी व्हायरस अ‍ॅप (Free Anti-virus App)
फोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक लोक अँटी व्हायरस अ‍ॅप्स इन्स्टॉल करतात. अँटी व्हायरस अ‍ॅप इंस्टॉल करणे चुकीचे नाही, परंतु कोणतेही अ‍ॅप मोफत डाऊनलोड करणे धोकादायक ठरु शकते. या प्रकारच्या अ‍ॅपमध्ये सुरक्षा ही मोठी समस्या आहे. त्यामुळे मोफत अँटी व्हायरस अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. जर तुम्ही असे करत असाल तर नक्कीच कंपनी पाहा मग डाऊनलोड करा.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha