मुंबई : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक क्रांतीकारी बदल घडत आहेत. जुनं मागे टाकून नवं अंगीकारलं जात आहे. या बदलाचं ताजं उदाहरण चीनमध्ये पाहायला मिळत आहे. चीनमधील एका वृत्तसंस्थेने चक्क बातम्या सांगणारा रोबो तयार केला आहेत. तो हुबेहुब माणसासारखा दिसतच नाही तर बोलतोही, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहिले की तो रोबो आहे, यावर विश्वास बसणार नाही.

चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने बुधवारी आर्टिफिशिअल इंटलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता असणाऱ्या अँकर रोबोचं टीव्हीवर पदार्पण केलं. इंग्लिश भाषेत बातम्या सांगणाऱ्या रोबोचं नाव झँग झाओ आहे. याआधीही झिनुआ वृत्तसंस्थेने अँकर रोबो तयार केला होता. पण त्याचा लूक बरा नसल्यानं त्यांनी पुन्हा नव्याने रोबो बनवला आहे.

झिनुआ न्यूज एजन्सी आणि चीनमधील सर्व इंजिन सोगोऊ डॉट कॉम यांनी संयुक्तरित्या या रोबो अँकरची निर्मिती केली आहे. "तो रिपोर्टिंग टीमचा सदस्य झाला असून तो वेबसाईट तसंच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 24 तास कार्यरत असेल. शिवाय बातम्यांची प्रॉडक्शन कॉस्ट करुन कार्यक्षमतेत सुधारणा होईल," असं झिनुआचं म्हणणं आहे.


आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, की पुढे तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय वाहिनीवर सर्रास रोबो न्यूज अँकर पाहायला मिळाला तर नवल वाटायला नको.

दरम्यान, रोबोमुळे काही गोष्टी सहजसोप्या होतील, असं वाटत असलं तरी  झिनुआच्या या तांत्रिक विकासाबद्दल विरोधी प्रतिक्रियाही मिळत आहेत. काही मिनिटांपेक्षा त्याला जास्त वेळ पाहू शकत नाही, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. तर कामं व्यवस्थित झाली, त्याचा चेहरा माणसांसारखा असला तरी अँकर रोबोमध्ये ह्युमन टच नसेल, असं काहींचं म्हणणं आहे.