मुंबई : राज्यातील सर्व ग्रामपंतायती येत्या दोन वर्षात फायबर ऑब्टिकने जोडण्याचा प्रकल्प आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे सर्व कामं ऑनलाईन होण्यास मदत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


एबीपी माझा आणि एचपीच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या 'रिइनव्हेन्ट माझा महाराष्ट्र' या अभियानाच्या पहिल्या पर्वाची आज सांगता झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, एबीपी न्यूज नेटवर्क सीओओ अविनाश पांडे आणि एचपीचे कार्यकारी संचालक राज श्रीवास्तव उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याचे हस्ते लोकाभिमुख काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील माहिती तंत्रज्ञान धोरण लोकाभिमुख आहे. आधुनिक सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

माहिती तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी आरोग्य क्षेत्रातही त्याचा वापर करणार असल्याचं मुख्यंत्र्यांनी सांगितलं.

भारत आणि इंडियातील अंतर कमी करण्यासाठी तंत्रज्ञान हे महत्वाची भूमिका बजावणार आहे, त्याकरता एबीपी माझाने केलेला उपक्रम चांगला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.