मुंबई : व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल होणारे फेक मेसेज सध्या चिंतेचा विषय बनला आहे. अशा व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपने अशा फेक मेसेज विरोधात मोहीम उघडली आहे.


फेक मेसेजबाबत युजर्समध्ये जागृतता निर्माण व्हावी यासाठी व्हॉट्सअॅपने वृत्तपत्रांमध्ये यासंबधीची जाहिरात प्रसारित केली आहे. एखादा फेक मेसेज विचार न करता फॉरवर्ड केल्यास तो घातक ठरु शकतो, त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्यावी असं आवाहन व्हॉट्सअपने युजर्सना केलं आहे.


धुळ्यात मुलं चोरीच्या अफवेमुळे जमावाने 5 जणांची मारहाण करुन हत्या केली होती. अशाचा प्रकारच्या काही घटना देशभर गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत. सोशल मीडियावरून व्हायरल होणारे फेक मेसेज अशा घटनांसाठी कारणीभूत ठरत आहेत.


याच पार्श्वभूमीवर सरकारने व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया अॅपला व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजवरुन खडसावलं होतं. झपाट्यानं व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजवर लगाम घालण्यासाठी उपाययोजना करा, असं सरकारने सांगितलं होतं.


सरकारच्या सूचनेनंतर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजवर लगाम लावण्यासाठी व्हाट्सअॅप काय करणार आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र व्हॉट्सअॅप फेक मेसेज ओळखण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन लोकांना काही सल्ले दिले आहेत.


'आपण एकत्रित येऊन फेक मेसेजची समस्या दूर करु शकतो', असं व्हॉट्सअपने आपल्या जाहिरातीत म्हटलं आहे.



व्हॉट्सअॅपच्या जाहिरातीत काय आहे?

- माथी भडकावणारे मेसेज फॉरवर्ड करताना विचार करा.
- संशयास्पद माहितीची आधी माहिती घ्या.
- व्हॉट्सअॅपवर येणारे फोट नीट पाहा, काही फोटोंमध्ये छेडछाडदेखील केलेली असते.
- मेसेजवर आलेल्या लिंक फॉरवर्ड करण्याआधी तपासून घ्या.
- मेसेजची विश्वासार्हता तपासण्यासाठी इतर वेबसाईट किंवा अॅप्सची मदत घ्या.
- मेसेज शेअर करताना विचार करा.
- एखादा नंबर किंवा ग्रुप संशयास्पद आढळल्यास, तो नंबर ब्लॉक करु शकता किंवा ग्रुप तुम्हा सोडू शकता.
- फेक न्यूज वारंवार फॉरवर्ड केल्या जातात. त्यामुळे वारंवार येणाऱ्या मेसेजपासून सावधान राहा.


संबंधित बातम्या


फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर


आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर