लाँचिंगनंतर तीनच दिवसात 'भीम' अॅप भारतात सर्वात लोकप्रिय
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 09:51 PM (IST)
मुंबई : लाँचिंगनंतर अवघ्या तीनच दिवसात केंद्र सरकारचं 'भीम' अॅप सर्वात लोकप्रिय ठरलं आहे. 'भारत इंटरफेस फॉर मोबाईल' अर्थात 'भीम' हे ऑनलाईन पेमेंट अॅप भारतातलं सर्वात प्रसिद्ध अँड्रॉईड अॅप असल्याचं समोर आलं आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी 'डिजिधन मेला'मध्ये भीम हे आधार संलग्न मोबाईल पेमेंट अॅप लाँच केलं होतं. त्यानंतर भारतात गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप अव्वल ठरलं आहे. 30 लाखांपेक्षा जास्त यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. सध्या हे अॅप फक्त अँड्रॉईडवर उपलब्ध असून लवकर अॅपल यूझर्सनाही ते अवेलेबल होईल. या अॅपला आतापर्यंत 4.1 इतकं रेटिंग मिळालं आहे. भीम अॅपच आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भीमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली. या अॅपमुळे गरिबांना व्यवहार सोपे होणार आहेत. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. एवढंच नाही, तर हे अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल, असंही मोदींनी सांगितलं. भीम अॅप कसं वापरणार? • अँड्रॉईड स्मार्टफोनवर भीम अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. • त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो) • तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल. • मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अॅपचा वापर करता येईल. • इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.