नवी दिल्ली : भारताला आज मिसाईल तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था अर्थात MTCR चं पूर्ण सदस्यत्व मिळालं आहे. हे सदस्यत्व मिळवणारा भारत 35 वा देश बनला आहे.  तीन दिवसांपूर्वीच भारताला NSG अर्थात अणूइंधन पुरवठादार गटाच्या सदस्यत्वाने हुलकावणी दिली होती. मात्र आता MTCR चं सदस्यत्व मिळाल्याने भारतासाठी हे एक मोठं यश मानलं जात आहे.

 

या सदस्यत्वामुळे भारत हा चीन आणि पाकिस्तानच्या पुढे गेला आहे.

 

MTCR चं सदस्यत्व मिळाल्यामुळे भारत आता दुसऱ्या देशांशी मिसाईल तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करु शकेल.

 

भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी फ्रान्स, नेदरलँड आणि लक्झमबर्गच्या राजदुतांच्या उपस्थितीत MTCRच्या सदस्यत्वावर स्वाक्षरी केली.

 
गेल्या वर्षी सदस्यत्वासाठी अर्ज

भारताने MTCRच्या सदस्यत्वासाठी गेल्या वर्षीच अर्ज केला होता. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर भारताला हे सदस्यत्व मिळालं, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितलं.

 

35 सदस्यीय MTCR

ज्या चीनने भारताच्या NSG अर्थात अणूइंधन पुरवठादार गटाच्या सदस्यत्वाला विरोध केला, तो चीन MTCR चा सदस्य नाही. MTCR मध्ये भारतासह 35 राष्ट्रांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तानलाही अद्याप याचं सदस्यत्व मिळालेलं नाही.

 

इटलीही नरमली

भारताच्या MTCRच्या सदस्यत्वासाठी इटलीचा विरोध होता. इटलीच्या दोन नौसैनिकांवर भारतात हत्येचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळेच इटलीचा विरोध होता. मात्र भारताने त्या नौसैनिकांना इटलीला जाण्यास परवानगी दिल्यानंतर इटलीचा विरोधही मावळला.

 

काय आहे MTCR ?

*MTCR म्हणजे मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम

*MTCR 34 देशांचा समूह आहे.

*जगभरात मोठ्या, विनाशकारी मिसाईलचा प्रसार रोखणं, मानवरहित हत्यारांना आळा घालण्याचं काम

*मिसाईल क्षमता 300 किमी क्षेत्रापर्यंतच असावी

*चीन आणि पाकिस्तान सदस्य नाही

 

MTCR चे भारताला फायदे

*भारताला मानवरहित ड्रोन खरेदी करता येतील

*अमेरिकेडून प्रिडेटर ड्रोन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा

* भारत ब्राम्होससारखं मिसाईल तंत्रज्ञान विकू शकतं

*NSG मधील भारताच्या सदस्यत्वासाठी मजबूत दावा