नागपूरः गेल्या 48 तासांपासून दिवसभरात काही मिनिटांचा अवकाश सोडून नागपूर जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. 18 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या 24 तासात दहा जण वाहून गेल्याने मृत्युमुखी पडले आहे. आपत्कालीन स्थितीत मतदीसाठी तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. नांद धरण, रामा धरण या ठिकाणच्या विसर्गाची प्रत्यक्ष पाहणी केली व अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती घेतली. काल झालेल्या नांदा गोमुख येथील दुर्घटनेबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठे व त्यातील विसर्ग याची माहिती नदीकाठच्या गावांना देण्याबाबत त्यांनी आदेश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यात पुढील काही तास पाऊस येण्याची शक्यता असून सर्व यंत्रणांनी सतर्क असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत या पावसामुळे एक जून पासून 13 जुलै पर्यंत विविध घटनेत 20 जण मृत्युमुखी पडले आहेत. 19 जण जखमी झाले आहेत 88 पशु देखील मृत्युमुखी पडले असून 293 घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या महिन्याभरात 2 हजार 399 हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले असून तातडीने मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे. ज्या गावांना पुराचा तडाका बसला आहे त्या ठिकाणी नागरिकांना गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य यंत्रणा देखील सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्पदंश प्रतिबंधात्मक औषधाची उपाययोजना करण्यात आली आहे. नागरिकांनी तातडीने तालुका आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


Gadchiroli Rain : गडचिरोलीतील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला


नागरिकांनी अशा परिस्थितीत मदत मागण्यासाठी तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये असे आवाहन करण्यात आले असून प्रशासनाने 24 तास संपर्क व्यवस्था सुरू ठेवली आहे.


तालुक्यांचे संपर्क क्रमांक


जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर 0712-2562668, तहसील कार्यालय नागपूर शहर -0712-2561975, तहसील कार्यालय नागपूर ग्रामीण -0712-2564577, तहसील कार्यालय कामठी -07109-288220 तहसील कार्यालय हिंगणा -07104-299534 तहसील कार्यालय काटोल -07112-222023, तहसील कार्यालय नरखेड -07105-232206 तहसील कार्यालय सावनेर -07113-232212, तहसील कार्यालय कळमेश्वर -07118-271358, तहसील कार्यालय रामटेक -07114-255124 तहसील कार्यालय मौदा -07115-281128 तहसील कार्यालय पारशिवनी -07102-225139 तहसील कार्यालय उमरेड -07116-244004 तहसील कार्यालय भिवापूर -07106-232241 तहसील कार्यालय कुही - 07100-222236 या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.