जालना : तूर, कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांपाठोपाठ राज्यात मोसंबी उत्पादक शेतकरीही मेटाकुटीला आला आहे. मोसंबीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबीचा भाव घसरल्याने हतबल झाला आहे.


पाच महिन्यांपूर्वी 39 हजार रुपये प्रति टन एवढा भाव असलेल्या मोसंबीला आज फक्त किमान 2 हजार ते 6 हजार एवढा भाव मिळतोय. एकेकाळी काबाड कष्टाने जोपासलेली बाग दुष्काळामुळे कापून टाकण्याची वेळ आली होती. आता मात्र चांगला सुकाळ झाल्याने बाजारभावाअभावी ही झाडं कापून टाकावी की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मोसंबीचं आगार समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीला 5 महिन्यांपूर्वी 39 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. मात्र आजघडीला आवक वाढल्याने हाच भाव कमीत कमी दोन हजार आणि जास्तीत जास्त सहा रुपये प्रति टनांवर येऊन ठेपला आहे.

बाजारभाव नसल्याने मोसंबी झाडावरच वाळली!

जालन्यातील मोतीगव्हान गावचे मोसंबी उत्पादक शेतकरी वामन मोहिते यांनी यंदा आपल्या मोसंबी बागेवर फवारणी, खते, खुरपणी यावर अगणित खर्च केला. पण काबाडकष्ट घेऊन देखील वामन मोहिते आपल्या बागेतील झाडांना लागलेल्या मोसंबीचं एक फळही विकायला तयार नाहीत. कारण यंदा तूर, कांदा, द्राक्ष आणि डाळींबाच्या भावासारखेच हाल मोसंबीचेही चालू आहेत. 2 ते 6 हजार रुपये प्रति टनाच्या पलीकडे एकही व्यापारी मोसंबी खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोसंबी झाडांवरच वाळायला लागलीये.

केशव मोहिते या मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचीही हीच अवस्था आहे. गेल्या वर्षीचा चांगला पाऊस पाहता चांगलं उत्पन्न निघेल या आशेने त्यांनी खत फवारणीवर खर्च केला. अर्थात त्यांच्या मेहनतीला चांगलं फळ देखील मिळालं. त्यांना अवघ्या अडीचशे झाडांना 15 टन माल निघाला. मात्र बाजारभाव कोसळल्याने त्यांचं उत्पन्न बरोबरीत सुटलं आहे. मागच्या वर्षी दुष्काळ असताना त्यांच्याकडे चार पैसे उरले होते. मात्र यंदा त्यांना सुकाळानेच मारलं आहे.

जालना बाजार समितीत मोसंबीचे ढिग

जालना बाजार समितीच्या प्रांगणात शेकडो क्विंटल मोसंबीचा खच पडलेला आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी विकायला आणली. पण 2 ते 6 हजार रुपये टन भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मोसंबी न विकता ती तिथेच सोडून दिली. त्यामुळे आजघडीला बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीचे ढिग तसेच पडून आहेत.

जालना जिल्ह्यातील प्रत्येक मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचे आजघडीला हेच हाल आहेत. त्यामुळे मोसंबी विकून घरात लाखो रुपयांचं भांडवल खेळण्याऐवजी दारिद्र्य दिसायला लागलं आहे.

यंदा तूर, कांदा, द्राक्ष, डाळिंब, आंबे आणि मोसंबी ही सगळी फळं एकाच वेळी बाजारात आली. 2012 आणि 2013 ला दुष्काळाच्या फटक्याने कसंबसं सावरलेल्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीच्या चांगल्या पावसाने तारलं. साहजिकच जून-जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी मृगबहराचं नियोजन केलं. त्यामुळे यावर्षी चांगलं उत्पादन झालं आहे.

जालना बाजार समितीमध्ये मागच्या दोन महिन्यात म्हणजेच मार्च-एप्रिलमध्ये 22 हजार ते 25 हजार क्विंटल एवढी आवक झाली. सद्य परिस्थितीत हीच अवस्था कायम असल्याने भाव आणखी कोसळले आहेत. मोसंबीलाही शासनाने आधारभूत किंमत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

जालना जिल्ह्यातील हजारो हेक्टर बागा 2012 -2013 च्या दुष्काळात नष्ट झाल्या. कशाबशा जगवलेल्या बागांना निसर्गाची साथही मिळाली. पण आता चांगलं उत्पादन होऊनही मालाचे ढीग सोडून जाण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.