सोलापूर : सदाभाऊंनी पाहुण्यासारखं येऊ नये, यायचं असेल तर आत्मक्लेश यात्रा पूर्ण होईपर्यंत या, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना दिला आहे. आत्मक्लेश यात्रेत मनापासून सहभागी होणाऱ्यांचं स्वागत आहे, असेही खासदार शेट्टी म्हणाले.


आत्मक्लेश यात्रेत सहभागी होण्यासाठी राजू शेट्टींनी सदाभाऊंना अट घातली आहे. "कार्यकर्त्यासारखं यायचं असेल तर स्वागत. पाहुण्यासारखं यायचं असेल तर नको.", असे राजू शेट्टी म्हणाले.

सत्तेत गेल्यावर सदाभाऊ बदलले. हा निसर्ग नियम आहे, असा टोलाही खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. शिवाय, यावेळी राजू शेट्टींनी शिवसेनेने कर्जमुक्तीबाबत घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं.

हजारोंच्या संख्येने आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून शेतकरी मुंबईला कूच करणार आहेत. कोणीही कोणत्याही वाहनाला स्पर्श करणार नाही, अशी माहिती राजू शेट्टींनी दिली.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे. सत्तांतर झालं पण शेतकऱ्याच्या अवस्थेत बदल झाला नाही. परिस्थितीत बदल होईल या आशेनेच शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवलं. पण भ्रमनिरास झाला, अशी टीका करत राजू शेट्टी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्याचवेळी, प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरातील तूर खरेदी झाली पाहिजे, अशी मागणीही शेट्टींनी केली.

“राजकीय नेत्यांनी लग्न सोहळ्यावर उधळपट्टी करून संपत्तीचं हिडीस प्रदर्शन करू नये. एकीकडे शेतकरी मरणासन्न आहे आणि नेते कोट्यवधी रुपये सोहळ्यावर खर्च करतात, हे असंवेदनशीलतेच लक्षण आहे.’, अशी टीकाही खासदार राजू शेट्टींनी केली.