मुंबई : डीआयजी निशिकांत मोरे यांना अटकेपासून तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयानं नकार देत त्यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेल्या डीआयजी मोरेंना सत्र न्यायालयानं कोणताही दिलासा दिलेला नाही, त्यामुळे पुढील सुनावणीत विचार करू असं न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केलं. तसेच विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या त्या मोबाईल क्लीप्सचा सविस्तर पंचनामा करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


शुक्रवारच्या सुनावणीत निशिकांत मोरेंच्यावतीनं दावा करण्यात आलाय, की त्यांच्याजवळील मोबाईल क्लीपमध्ये पीडित मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग झाल्याचं स्पष्ट होत नाही असा दावा केलाय. तसेच हे आरोप बिनबुडाचे असून केवळ दोन कुटूंबियांमध्ये आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेल्या वादावरून करण्यात आल्याचे पुरावे कोर्टापुढे मांडले. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर घरात सुसाईड नोट लिहून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी ही तिच्या प्रियकरासोबत गेल्याचं स्पष्ट झालं असून नवी मुंबई पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती कोर्टापुढे सादर करण्यात आली आहे.


मोरेंवर पोक्सो अंतर्गत एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा आरोप ठेवण्यात आला आहे. यासंपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं डीआयजी निशिकांत मोरे यांना सेवेतून निलंबित केलं आहे. याप्रकरणी आरोपी सध्या फरार असून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. तसेच तक्रारदार मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले असून पीडितेचा मोबाईल तसेच मोरेंच्या पत्नीचाही मोबाईल कलिना येथील न्यायवैद्यक शाळेत पाठवला असून त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा असल्याचं सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितलं.


काय आहे प्रकरण -


5 जून 2019 रोजी निशिकांत मोरे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी तिच्या वाढदिवासानिमित्त जमले होते. त्यावेळी केक कापण्याच्या घटनेवरून मोरेंवर हा विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील तळोजा पोलीस स्थानकांत पुणे पोलिसांच्या परिवहन शाखेत डिआयजी असलेल्या निशिकांत मोरेंविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन पीडित मुलगी सुसाईड नोट लिहून तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिनं मोरेंच्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला जात असल्याचा उल्लेख केला होता.


केवळ बदनामी करून बदला घेण्याच्या हेतूनं ही खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा मोरे यांच्यावतीनं करण्यात आला आहे. मोरे यांच्या पत्नीसोबत पीडितेच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहार फिसकटल्यानं मोरेंविरोधात ही खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. निशिकांत मोरेंच्या पत्नी निशिका मोरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक फसवणुकीची तसेच विनयभंगाची तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पीडितेचे आईवडील सध्या जामीनावर बाहेर आहेत.




संबंधित बातम्या