Suresh Dhas on Walmik Karad Mcoca बीड : आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad Mcoca) आज अखेर मकोका (Mcoca) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या एकंदरीत प्रकरणावरुन आरोपांच्या फैरी झाडत रान पेटवणाऱ्य भाजप आमदार सुरेश धसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडला आज मोक्का लागला असला तरी संतोष देशमुख यांच्या हत्येत एकालाही सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याच प्रमाणे एसआयटीने त्यांचे काम करून दाखवले. कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि एसआयटी आपले काम करत आहे. त्यांनी जी कडी जोडली आहे त्यानुसार कारवाई केली गेली आहे. जिथे जिथे कडी जोडली जाईल तिथपर्यंत कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया देत आमदार सुरेश धस यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे.
कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी न्यायालयात कोणता युक्तिवाद केला?
आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी १० दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली?, हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला?, असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा...आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले.
परळीकरांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा
दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणात जातीय द्वेषातून राजकीय दबावापोटी कार्यवाही न करता निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देत परळीकरांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, स्व. संतोष भैय्या देशमुख यांची हत्या झाली त्यामध्ये पोलिस प्रशासनाने आरोपी अटक केलेली आहेत. महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या तपासयंत्रणा योग्य तो तपास करत आहेत. आवश्यक ते पुरावे असतील आवश्यक असलेले आरोपी असतील त्यांना अटकही केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची मिडीया ट्रायल, परळी व बीड जिल्ह्याची बदनामी करून जातीयद्वेष पसरवत आहेत त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे.
हे ही वाचा