Dhule: राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलासह शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यानं आर्थिक फटका बसत असताना आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी धास्तावले आहेत. आधीच हे जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 50 रुपयांपासून ते 300 ते 350 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. (fertilizer price hike)
शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.
खताच्या किमतीत झाली वाढ
सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबवली होती, मात्र उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव दरानुसार डीएपी डाय अमोनिया फॉस्फेट खताची किंमत प्रती बॅग 1 हजार 350 रुपयांवरून 1 हजार 590 रुपये झाली आहे. तर 10:26:26 आणि 12:32:16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये होणार आहेत.तर सुपर फॉस्फेट 470 वरून 520 रुपयांपर्यंत दर वाढणार आहेत. या नवीन वर्षात सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असताना कसेबसे रब्बी हंगामात पेरणी केली. त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांचा पाय खोलात गेला आहे.
खत दरवाढ तपशील:
- DAP: ₹1350 वरून ₹1590
- 10:26:26 आणि 12:32:16: ₹1470 वरून ₹1725
- सुपर फॉस्फेट: ₹470 वरून ₹520