Sunita Williams Return Video: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. हे दोघंही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत.
अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत, क्रू-९ चे इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील पृथ्वीवर परतले आहेत.
सुनीता विलियम्स यांचा 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक-
नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. तसेच सुनीता विल्यम्स यांनी, 'अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला' म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे.
5 जूनला सुनीता विल्यम्स गेल्या होत्या अंतराळात-
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले.