गजाननचे वडील बाळासाहेब बोराडे पूर्वी या स्वत:च्या साडेसहा एकर जमिनीत कापूस, सोयाबीन अशी पिकं घेत होते. गजाननने आधी मल्चिंग आणि ठिबकवर कलिंगडाचं पीक घेतलं आणि यंदा 2 एकरावर बंजारा जातीच्या मिरचीची लागवड केली.
गजानननं कलिंगडाच्या काढणीनंतर जमीन चांगली नांगरुण घेतली. त्यात शेणखत घातलं. 6 फूट अंतर सोडून बेड तयार केले. ट्रॅक्टरच्या मदतीनं यावर मल्चिंग पेपर अंथरला. याला दीड फुटांच्या अंतरावर छिद्र पाडून घेतली. आणि 15 एप्रिलला त्यावर बंजारा जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली. पाण्याच्या नियोजनासाठी गजानननं ठिबकचा वापर केला.
9 लाखांचा निव्वळ नफा
आतापर्यंत मिरचीचं 9 टन उत्पादन मिळालं आहे. गजाननने याची विक्री माजलगाव, केज, बीडसह स्थानिक बाजारात केली. मिरचीला 40 रुपयांपासून 70 रुपयांचा दर मिळाला. यातून त्याला 5 लाख 40 हजारांचं उत्पन्न झालं. अजून 10 टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा गजाननला आहे. म्हणजेच यातून अजून 10 लाखांचं उत्पन्न गजाननला मिळेल. रोपं, खतं, मजूरी, मल्चिंग, ठिबक असा दीड लाखांचा खर्च गजाननला आला आहे. म्हणजेच ही तिखट मिरची गजाननला 9 लाखांचा नफा मिळवून देत आहे.
गजाननने नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दिलं. व्यवसायाची नवी संधी शोधली. पारंपारिक शेतीला नव्या पीक पद्धतीनं आधुनिकतेची जोड दिली आणि एक यशस्वी शेतकरी होण्याचा प्रवास सुरु केला. गजाननची ही कहाणी तरुण शेतकऱ्यांना शेतीतील संधीची जाणीव करुन देते आहे.
पाहा यशोगाथा :