मुंबई : नाफेडच्या केंद्रांवर 48 तासात तूर खरेदी सुरु न झाल्यास मी स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून सहकार आणि पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

तूर खरेदीची मुदत संपल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने तूर खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी सर्व तहान-भूक विसरुन 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सरकारी तूर खरेदी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रांबाहेर पाच ते सात किमीच्या ट्रॉलीच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

बाजार समित्यांचं सरकारला पत्र

महाराष्ट्रात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत.

व्यापाऱ्यांकडून तूर तीन ते साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी केली जाते. सरकारी तूर केंद्रांवर शेतकऱ्यांकडून तुरीला 5 हजार रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. मात्र सरकारने तूर खरेदी करण्यासाठी ठेवलेली मुदत 22 एप्रिल रोजी संपली. मात्र त्यानंतरही तुरीची आवक सुरुच आहे.

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत. आज ना उद्या तूर खरेदीचा निर्णय होईल, या आशेने शेतकरी एवढ्या उन्हात रांगेत बसून आहे. बाजारात आणलेली तूर पुन्हा घराकडे नेऊन, निर्णय झाल्यानंतर बाजारात आणणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही, त्यामुळे तूर खरेदीचा निर्णय होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करु, असं आश्वासन देणारं सरकार आपला शब्द पाळतं का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

औरंगाबादमध्ये तूर खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्याला चक्कर

सरकारने तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका 75 वर्षीय शेतकऱ्याला तूर खरेदी केंद्रावर चक्कर आली. खाली पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत आणि त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत.

सोनवाडी येथील शेतकरी रंगनाथ आल्हाट मागील आठ दिवसांपासून तूर विक्रीसाठी पैठण येथील केंद्रावर बसून होते. त्यांना उन्हाचा चटका बसून चक्कर आली. त्यामुळे त्यांचा पाय कंबर आणि मांडी यांच्यामध्ये मोडला आहे. त्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे.

रंगनाथ आल्हाट यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 50 हजार रूपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र तूर विकली तरीही 28 हजार रुपयेच मिळतील, त्यामुळे उपचारासाठी बाकीचे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे.

संबंधित बातम्या :

22 एप्रिलपर्यंत नाफेडच्या केंद्रांवर आलेल्या तुरीचीच खरेदी : मुख्यमंत्री


कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक, किती विक्री?


सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय


काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक


तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च


तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना


नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा