बीड : एसटी महामंडळात बसचालकाची नोकरी करणाऱ्या बीडच्या प्रदीप थिटे यांना शेतीची प्रचंड ओढ होती. या ओढीनंच त्यांनी डोंगराळ भागातील नापिक जमिनीला सुपीक करुन त्यात मिरचीचं भरघोस उत्पादन घेतलं.


प्रदीप थिटे एसटी महामंडळात चालक म्हणून काम करतात. शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी डोंगरावर असलेली आपली दोन एकर शेती कसण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जेसीबी मशीननं डोंगराळ जागेला सपाट करुन, तिथं तब्बल 9 लाख रुपये खर्च करुन तळ्यातील गाळ आणून टाकला. 2 एकरापैकी 30 गुंठ्यावर त्यांनी महिको तेजा आणि अंकुर जातीच्या मिरचीची लागवड केली आहे.  सध्या त्यांना या मिरची पिकातून या लागवडीतून लाखोंच्या नफ्याची त्यांना अपेक्षा आहे.

नापिक जमिनीला सुपीक बनवण्यासाठी प्रदीप यांनी सुरुवातीला बेड तयार करून त्यावर शेणखत टाकलं आणि मल्चिंग अंथरलं. मल्चिंगसाठी अकरा हजार रुपये तर शेणखतासाठी पाच हजारांचा खर्च झाला. तर 30 हजार रूपये खर्च करुन पाण्यासाठी ड्रिपची सोय केली. एक दिवसा आड, याप्रमाणे मिरचीला पाणी दिलं जातं.  फवारण्या आणि मशागतीचा एकूण त्यांना 65 ते 70 हजार रुपये खर्च झाला आहे.

आता या मिरचीची तोडणी चालू असून, लातूरच्या मार्केटमध्ये 25 ते 30 रुपये किलो दरानं विक्री करण्यात येईल. एकूण खर्च वगळता या 30 गुंठ्यातून त्यांना दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

थिटे यांनी डोंगराळ भागात केलेली ही यशस्वी शेती या परिसरातील शेतकऱ्यांसाठी उदाहरण ठरली आहे. नापिकीवर मात करुन अतिशय कमी जागेत त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता भाजीपाल्याची शेती करु लागले आहेत.

प्रदीप यांनी ही शेती डोंगर फोडून केली असल्याचं इथले शेतकरी सांगतात. लाखो रुपये खर्च करुन अशी शेती फुलवणं तसं अशक्य समजलं जायचं. मात्र, योग्य नियोजन आणि व्यनस्थापनामुळे प्रदीप थिटेंनी ते शक्य केलं आहे.