Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारा सोनू एक उत्तम व्यक्तीदेखील आहे. रिल सुपरस्टार असणारा सोनू रिअल लाईफमध्येही हिरो आहे. पंजाबच्या सोनू सूदचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडमध्येही सोनू सूदचा बोलबाला आहे. 


सोनू सूदला समाजसेवेची प्रचंड आवड आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेला सोनू इंजिनिअर व्हावा, अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती. आई-वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत अभिनेत्याने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. खिशात फक्त 5500 रुपये घेऊन सोनूने मुंबई गाठली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या संघर्षमय प्रवासाला सुरुवात झाली. 


'या' सिनेमामुळे सोनू सूदला मिळाला पहिला ब्रेक


सोनू सूदने 1996 मध्ये 'मिस्टर इंडिया' या स्पर्धेत भाग घेतला होता. पण या स्पर्धेत त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर सलग तीन वर्ष तो संघर्ष करत राहिला. त्यानंतर एका दाक्षिणात्य सिनेमाने त्याला ब्रेक मिळाला. 1999 साली 'कालाझगर' या सिनेमाच्या माध्यमातून सोनूने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर 2002 मध्ये तो 'शहीद ए आजम' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला. 


सोनू सूदचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Sonu Sood Movies)


दाक्षिणात्य सिनेमांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सोनू सूदने हिंदी सिनेसृष्टीतही चांगलं काम केलं आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) बहुचर्चित 'दबंग' या सिनेमातील सोनूची छेदी सिंहची भूमिका चांगलीच गाजली. गेल्या 25 वर्षांपासून वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून सोनू सूद प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या 25 वर्षांच्या संघर्षमय प्रवासात त्याने 47 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. यात हॉलिवूडपटांचाही समावेश आहे. हॉलिवूड सिनेमात तो जॅकी चैनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. अनेक गाजलेल्या सिनेमांत तो नायक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


सोनू सूदच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या... (Sonu Sood Net Worth)


मेहनतीच्या जोरावर शून्यापासून सुरू केलेला सोनू सूदचा प्रवास आज कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहचला आहे. सिनेमांसह जाहिरांतींमधून सोनू सूद चांगलीच कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार, सोनू सूद तब्बल 135 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मुंबईतील अंधेरी भागात सोनूचं आलिशान घर आहे. तसेच जुहू परिसरात त्यांचं एक हॉटेलदेखील आहे. सोनूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. 


सोनू सूदने कधी नायक तर कधी खलनायक म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोनूने पंजाबी, कन्नड, तामिळ, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांमध्ये काम केलं आहे. कोरोनाकाळात सोनूने अनेकांना मदत केली आहे. सोनू सूद सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 


संबंधित बातम्या


Sonu Sood: कोरोना काळात केलेल्या मदतीसाठी पैसे कुठून आणले? सोनू सूदनं स्पष्टच सांगितलं