ABP AI Anchor : एबीपी (ABP) नेटवर्कच्या तमिळ भाषिक म्हणजेच एबीपी देसम हे डिजीटल चॅनल दोन वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एबीपीमध्ये एक नवा प्रयोग आकारात येत आहे. एबीपी देसममध्ये AI अँकर आता बातम्या सांगणार आहे. या AI अँकरचं नाव AI आयरा असं असणार आहे. नव्या यंत्रणासह एबीपी माध्यम क्षेत्रात एक नवं पाऊल टाकत आहे. त्यामुळे आता एबीपीच्या तेलुगू भाषिक प्रेक्षकांना AI आयराच्या माध्यमातून बातम्या पाहता येणार आहे. 


कसं असणार AI आयराचं काम? 


AI आयरा ही एबीपी देसमची AI वृत्तनिवेदक म्हणून काम करणार आहे. आयरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वृत्तनिवेदक प्रणाली असणार आहे. या प्रणालीमुळे आयरा बातम्या वाचण्यास सक्षम होणार आहे. आयराला इतर वृत्तनिवेदकांसारखेच प्रशिक्षित केले जाणार आहे. पंरतु आयरा ही इतर वृत्तनिवेदकांपेक्षा वेगवान आणि अचूक असणार आहे. आयरामुळे एबीपीच्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये अधिक प्रगती होणार आहे. तसेच आयरा ही आता चोवीस तास काम करु शकते. आयरामुळे आता बातम्या प्रसारित करण्याचा एक नवीन आणि उत्साहवर्धक मार्ग तयार होणार आहे. 


AI वृत्तनिवेदक म्हणजे काय?


AI अँकर हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे वृत्तनिवेदक असतात. हे वृत्तनिवेदक बातम्या वाचण्यास आणि प्रसारित करण्यास सक्षम असतात. मानवी वृत्तनिवेदकांसारखे असणारे हे वृत्तनिवेदक प्रत्यक्षात मात्र पूर्णपणे वेगळे असतात. इतर वृत्तनिवेदकांच्या तुलनेत AI वृत्तनिवेदक हे अधिक वेगवान आणि अचूक असतात. तसेच ते चोवीस तास न थकता काम करु शकतात. अगदी कमी खर्चात बातम्या प्रसारित करण्यास AI वृत्तनिवेदकामुळे मदत होऊ शकते. 


परंतु हे पूर्णपणे कृत्रिम असल्यामुळे बातम्या सांगताना ते मानवी वृत्तनिवेदकासारखे भावनिक प्रभाव पाडू शकत नाहीत. त्यामुळे काही वेळेस हे वृत्तनिवेदक बातम्या वाचताना भावनिकदृष्ट्या उदासीन वाटू शकतात. परंतु AI अँकर हे अद्याप पूर्णपणे विकसित झाले नाहीत. त्यामुळे काही वेळेस त्यांच्याकडून चुका देखील होऊ शकतात. त्यामुळे माध्यम क्षेत्रातला हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होण्यास अजून बराच अवधी असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या प्रयोगाची नांदी आता एबीपी देसममध्ये होणार आहे. त्यामुळे एबीपीच्या तंत्रज्ञान युगातील नव्या प्रवासाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच हा प्रयोग प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी आशा एबीपीला आहे. 



हेही वाचा : 


Friendship Day 2023 : मैत्री दिन 30 जुलै की 6 ऑगस्ट? जाणून घ्या नेमका कधी आहे 'फ्रेंडशिप डे'