Maharashtra Solapur News: पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा अंतिम सामन्यापेक्षा देखील जास्त उपांत्य फेरीमुळे रंगली. माती विभागातील पैलवान सिंकदर शेख (Sikander Sheikh) आणि पैलवान महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात झालेल्या सामन्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादग्रस्त ठरली. या सामन्यात पैलवान सिकंदरवर अन्याय झाल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली. या चर्चांना जातीय रंग देखील देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. याच मुद्यावरुन कुस्तीसम्राट अशी ओळख असलेल्या पैलवान अस्लम काझी (Aslam Kazi) यांनी कान टोचले आहेत. सिंकदर बाबतीत घडलेला प्रकार हा तो मुसलमान आहे म्हणून नाही तर गडबडीत झाला. त्यामुळे या प्रकाराला जातीय रंग देऊ नका, असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
"माती विभागातील अंतिम सामन्याबद्दल अनेकांचे मत आहे की या सामन्यात पक्षपातीपणा झाला. मात्र सुरुवातीपासून हा सामना अगदी पारदर्शकपणे सुरु होता. मात्र महेंद्रने बाहेरील डांग लावल्यानंतर एका बाजूने असे दिसले की सिकंदरवरुन आला आणि एका भूजावर पडला. त्यामुळे पंचानी चार गुण दिले. सिकंदरच्या कोचनी यासदर्भात हरकत घेतली. त्यावर निर्णय देताना ज्युरीनी गडबड केली असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांनी एकाच बाजूने बघून निर्णय घेतला. त्यांनी वेळ घेऊन चारही बाजूने तपासून निर्णय द्यायला हवा होता. त्यातच सिंकदरच्या कोचला आक्षेप घेताना ओढून नेतानाचा एक व्हिडीओ समोर आला त्यामुळे याला जास्त गालबोट लागले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचांना मी याबाबतीत बोललो तर त्यांच देखील म्हणणे आहे की महेंद्रला या डावासाठी दोन गुण आणि सिंकदरला एक गुण मिळायला हवा होता. इथे दोन गुणाची पार्शलिटी झाली. मात्र ही पार्शलिटी सिकंदर मुसलमान आहे म्हणून किंवा त्याला प्लॅन करुन हरवण्यासाठी झालेली नाही. ही फक्त अनावधानाने किंवा गडबडीत झालेली चूक आहे. जाणीवपूर्वक पंचांनी हे केलं असं मला वाटत नाही," असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
कुस्तीला जातीय रंग देऊ नका!
"मी जवळपास 20 वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे. सिंकदर शेख प्रकरणात राजकारण सुरु आहे आणि त्याला जातीय रंग दिला जातोय असं दिसतंय. मात्र पैलवान हीच आमची जात असते. अस्लम काझी असो किंवा सिंकदर शेख याच्यावर केवळ कोणताही एक धर्म प्रेम करत नाही. सर्व जाती धर्माचे लोक आमच्यावर प्रेम करतात. आम्ही देखील दररोज बजरंग बलीच्या पाया पडतो किंवा त्याची सेवा करतो. बजरंगबलीचे नाव घेऊनच आम्ही आखाड्यात उतरत असतो. मला ज्याने तालीम बांधून दिली तो व्यक्ती मारवाडी समाजाचा आहे. मी मुसलमान आहे. आणि माझ्या तालमीचे नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल आहे. कारण आमच्या इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. कुस्ती हा खेळ हा कुठल्या एका जाती धर्माचा खेळ नाही. त्यामुळे इथल्या प्रकारांंना जातीय रंग देऊन नये," असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
तुमच्या राजकारणामुळे कुठल्याही पैलवानाचे नुकसान होऊ नये!
कुस्तीगीर परिषदेच्या राजकारणाशी पैलवानांना काही देणेघेणे नाही. निवृत्त झालेल्या पैलवानांनी कुस्तीसाठी झटले पाहिजे, कुस्तीच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने कुस्तीगीर परिषदेला बरखास्त केले. मात्र हा अधिकार कुस्तीगीर महासंघाला नाही. कुस्तीगीर परिषद ही धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली संस्था आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघ जास्तीत जास्त आपली सलग्नता काढून घेऊ शकते, मात्र बरखास्त करु शकत नाही. त्यामुळे हा वाद न्यायलयात गेला. न्यायलयाने निकाल हा बाबासाहेब लांडगे, शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे नव्याने अध्यक्ष झालेले रामदास तडस कोर्टाच्या निर्णयानुसार मान्यता नाही. हा वाद आम्हाला महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आमच्या लक्षात आला. शरद पवार, बाबासाहेब लांडगे यांच्या कुस्तीगीर परिषदेला सहभागी न करुन घेता तडस यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली. त्यामुळे आता बाबासाहेब लांडगे आणि शरद पवार असलेल्या कुस्तीगीर परिषदेतर्फे मार्च महिन्यात नगरमध्ये महाराष्ट्र केसरी भरवली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र 6-7 कुस्त्या करुन जे आता महाराष्ट्र चॅम्पिअन झाले आहेत, रक्ताचे पाणी करुन जे महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र चॅम्पिअन झालेत त्यांचे प्रमाणपत्र चालणार नाही, ही अनधिकृत महाराष्ट्र केसरी आहे अशी तक्रार बाबासाहेब लांडगे यांनी केल्याचे कळते आहे. मात्र तुमच्या राजकारणामुळे कुठल्याही पैलवानाचे नुकसान होऊ नये अशी आमची भावना असल्याचे मत पैलवान अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
संग्राम कांबळेंवरील गुन्हा चुकीचा, तळमळीने विचारपूस केल्यास त्याला धमकी म्हणता येऊ शकत नाही
"संग्राम कांबळे हे माझे चांगले मित्र आहेत. जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यानंतर संग्राम कांबळेवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे चुकीचे आहे असं मला वाटते. त्या ऑडिओ क्लिपमध्ये संग्राम यांनी कुठलीही धमकी दिलेली नाही. केवळ त्यांनी जाब विचारला आहे. पैलवान हा रक्ताचं पाणी करतो. घामाचे पाट वाहतो. तो स्वत: करतो त्याचे आई वडील पैलवानाच्या खुराकासाठी कष्ट करतात. पंचांच्या एका निर्णयामुळे पैलवान महाराष्ट्र केसरी पासून वंचित राहू शकतो. पैलवान काचेचा भांडा असतो. एखाद्याच्या चुकीमुळे त्याचे आयुष्य बर्बाद होऊ शकते. या तळमळीने विचारपूस केल्यास त्याला धमकी म्हणता येऊ शकत नाही," अशी प्रतिक्रिया पैलवान अस्लम काझी यांनी दिली.