सोलापूर : बीड हत्याप्रकरणावरुन अडचणीत सापडलेला खंडणतील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्यानंतर आता त्याचे रोज नवनवीन कारणामे समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करीत असून या मशीनला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान देतो असे सांगून कराडने या मशिन मालकांना प्रत्येकी 8 लाख रुपये देण्यात सांगितले. तत्कालीन कृषीमंत्री हे माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असे कराडने सांगितल्याचे नागणे यांनी म्हटले आहे. त्यामध्ये विष्णू चाटेसह वाल्मिक कराड व त्याचे अनेक सहकारी सामील असल्याचा आरोपही इतर मशीन चालकाने केला असून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना केली आहे. दरम्यान, हे यंत्रमालक आता पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत.
वाल्मिकच्या मागणीनुसार 140 मशीन मालकांनी प्रत्येकी 8 लाख रुपये गोळा करून ते एका पोत्यात भरले आणि हे पैसे मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर कुठल्याच प्रकारचे अनुदान न मिळाल्याने या मशीन मालकांनी वाल्मिक कराड यास फोन करून आम्हाला अनुदान मिळाले नाही, आमचे पैसे परत द्या अशी मागणी केल्यावर त्यांना बीडला बोलवण्यात आले. त्यावेळी हे सर्व 140 मशीन मालक बीड येथे गेले असता तुमचे कोणते पैसे, असे विचारत कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचे नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक झाल्याचेही या मशीन मालकांनी सांगितले.
वाल्मिक कराड यांच्या दहशतीमुळे आम्ही पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नाही. आता वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर हे 140 मशीन मालक तक्रार देण्यासाठी पुढे आले असून यामध्ये संपूर्ण राज्यभरातील मशीन धारक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या मशीन धारकांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 40 पेक्षा जास्त मशीनधारक शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली असून आता मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या लोकांकडे दिलेल्या सर्व नोटांचे शुटींग, नोटांचे नंबर आणि काही फोटोही आहेत. याशिवाय तात्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटायला गेल्याचे सर्व रेकॉर्ड देखील पोलीस प्रशासनाकडे देण्यात आलं आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडचा सहकारी जितेंद्र छबुराव पालवे याला पैसे देतानाचे चोरुन फोटो यंत्रमालकांनी काढले होते, ते फोटोही आता समोर आले आहेत. ज्यामध्ये पालवे पैसे घेताना दिसून येतो. तर, धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी हे सर्वजण गेले असताना वाल्मिक कराड तेथेच होता, हेही दिसून येते.