सोलापूर: राज्यभरात चर्चेत आलेल्या अनगर नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा दिसून आला, एका उमेदवाराचाअर्ज बाद झाला, तर एकाने माघार घेतली त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली, आता अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. एकीकडे अनगरमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्याने जल्लोष पाहायला मिळतोय तर दुसरीकडे उज्ज्वला थिटे यांनी अर्ज बाद होण्यावरून न्यायालयात दाद मागितली आहे. याप्रकरणी एबीपी माझाशी बोलताना उज्ज्वला थेटे (Ujjwala Thite) म्हणाल्या, पाटील परिवाराचा विचार निवडणूक बिनविरोध करायचा होता. जेव्हा प्राजक्ता पाटील यांनी अर्ज भरला तेव्हा त्यांचा फोटो समोर आला होता, नंतर मी फॉर्म भरला तेव्हा माझाही फोटो समोर आला पण सरस्वती शिंदे ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला कधी हेच कळलं नाही. ज्या बाईचा डोक्यावरून पदर खाली पडत नाही, ज्या बाईला व्यवस्थित बोलता येत नाही, ती बाई यांच्या विरोधात जाऊन फॉर्म कशी भरली? याचा अर्थ शिंदे परिवार पण पाटीलच्या विरोधात आहेत का? जर मी उभी राहिले नसते तर त्यांना उभं करता येणार नाही, उज्ज्वला थिटे यांच्या फॉर्मवर हरकत घेण्यासाठी सरस्वती शिंदेचा अर्ज भरला होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Ujjwala Thite)

Continues below advertisement


Ujjwala Thite: तुम्ही तुमच्या सुनेचा अर्ज मागे घ्या


राजन पाटील यांनी मला नगरसेवक पदाची ऑफर दिली होती, शिवाय मुलाला नोकरी देतो म्हणाले होते. पण मी सांगितलं मला असं काही नको मला नगराध्यक्ष पदच हवे आहे. तुम्ही तुमच्या सुनेचा अर्ज मागे घ्या, मग झाली बिनविरोध निवडणूक घोषित, फक्त नगराध्यक्ष पदासाठी चुरस होती, गाव तिथं जमलं होतं, त्यांनी गावकऱ्यांसमोर म्हटलं असतं , उज्ज्वला थिटे आपली लेक आहे, तिला आपण नगराध्यक्ष करायचं गावकऱ्यांनी निर्णय दिला असता असंही त्यांनी म्हटलं आहे.


Ujjwala Thite: माझ्या मुलाला मारायला 200 लोकं पाठवता


तुमचे पती त्यांच्याकडे कामाला होते, पगार सुरू होता, तुम्ही त्यांना दादा म्हणता कसं झालं सगळं, आता सुद्धा मला राजन पाटील याच्यामुळेच पेन्शन प्राप्त होते. पाटील परिवाराचे आमच्यावर उपकार आहे. जर फॉर्म भरताना जर ते समोर दिसले तर वडील या नात्याने त्यांचे पाया देखील पडले असते, मी त्यांना विचारेन कसे आहेत वगैरे, उपकार आहेत पण तुम्ही कोणत्याही स्त्रीच्या मुलावर हल्ला करता, त्याच्या मागे हॉकी स्टीक, रॉड, सळई, गज घेऊन ५-५० लोक लावता, तो ज्या शेतामध्ये कामाला जातो तिथे तिथे गाड्या घेऊन त्याच्या मागे लागता, एखादी मांजरीच्या पिल्लू पळवून नेलं, दुखावलं तर मांजर देखील पाठलाग करते, कुत्र असेल तर तेही भुंकत येतं, माझा हाडा मांसाचा गोळा इतक्या कष्टाने त्याला मोठा केला आहे. त्याला समोर मारायला लोक पाठवता, 200 लोकं त्याला मारायला पाठवता, त्यावेळी मी कसं गप्प बसणार आहे, तुमच्या मुली तर गप बसल्या असत्या का? असा सवालही थिटेंनी उपस्थित केला आहे. 


Ujjwala Thite: माझ्या सारख्या अनेकांवर अन्याय झाला


मी फक्त माझ्या कुंटूबासाठी निवडणुकीला उभा राहिले नव्हते, असे आमच्यासारखे अनगरमध्ये किती जणांवर तरी अन्याय झालाय, या आधी देखील काही कुटुंबाला असं गावाबाहेर काढलं. माझ्या सारख्या अनेकांवर अन्याय झाला, माझ्या रूपात त्यांना न्याय मिळेल, ४० वर्षापूर्वी त्यांनी असंच एकाला माझ्या मुलाच्या वयाच्या असणाऱ्या मुलाला शिवसेनेतून ते फिरत होते, त्या घरालाही गावातून बाहेर काढलंय, अनेकांची लढण्याची हिम्मत नव्हती, मला त्यांच्यापेक्षा जास्त मतदान झालं असतं, त्यांना भीती वाटली, आपलं गावं आपल्या विरोधात आहे, आणि आपण आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून आलोय की आम्ही बिनविरोध करणार आहोत,मग मला कितीही मत पडूद्या ते त्यांना सहन होण्यासारखं नव्हतं त्यामुळे त्यांनी कागद अदलबदल केली, मला मतदान झालं असतं, गाव विरोधात आहे हे लक्षात आलं असतं, म्हणून त्यांनी कागद अदलबदल केली असंही थिटे यांनी आरोप राजन पाटील परिवारावर केले आहेत.


Ujjwala Thite: राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगरसिद्धच्या पिंडावर शपथ घ्यावी


फॉर्म भरायचं म्हटलं तर इतका त्रास झाला, उद्या आम्ही गावात गेलो तर काय होईल याचा विचार करा. माझ्या घरची अवस्था बघा, शेती आज कशी आहे आणि आधी कशी होती दाखवा. हा संघर्ष आता विकोपाला गेला आहे, माझ्या भावना दुखावल्या आहेत. मला पैशाचा मोह नाही, राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगरसिद्धच्या पिंडावर शपथ घ्यावी की या मुलाला आणि मला काही करणार नाहीत. त्यांनी झालेल्या चुका मान्य केल्या तरच मी परत गावात जाण्याचा विचार करेन असंही उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं आहे.