सोलापूर : पुण्यात कामावर निघालेल्या तरुणीला डंपरने चिरडल्याने थरकाप उडाला असतानाच सोलापूरमध्येही भयावह घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यात मालवाहू ट्रकने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा कर्मचारी ट्रकखाली चिरडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. 


टोल न देता बॅरिकेट तोडून जाण्याचा प्रयत्न 


दरम्यान, टोल न देता बॅरिगेट तोडून निघालेल्या ट्रकने टोलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावरील पेनूर टोल नाक्यावर घडली. या घटनेत हनुमंत अंकुश माने हा टोल कर्मचारी मृत झाला. आज (9 ऑक्टोबर) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित मालवाहक ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. मोहोळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


पुण्यातील कोथरूडमध्ये 'हिट अँड रन'


दुसरीकडे, अपघाताची राजधानी झालेल्या पुण्यात सुद्धा कोथरूडमध्ये सुद्धा आज हिट अँड रनची घटना घडली. तरुणीला डंपरनं उडवल्यानं जागीच मृत्यू झाला. रस्ता क्रॉस करत असताना डंपरनं तरुणीला धडक दिली. डोक्यावरून मिक्सरचं चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यू झालेली मुलगी मुळची अमरावती येथील आहे.


आरती सुरेश मनवाने (वय 23) असे त्या तरुणीचे नाव असून एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूडमध्ये वसतिगृहात राहत होती. मुलगी पायी चालत असताना डिव्हायडरवरून रस्ता ओलांडत होती. मिक्सर डंपर समोर आल्याने ती चाकाखाली गेली. या घटनेत मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मिक्सर चालकाने घटनेनंतर तिथून पळ काढला. 


इतर महत्वाच्या बातम्या