अकलूज: मंगळवेढा पाठोपाठ सोलापूर येथे झालेल्या फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे भाजप विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी दांडी मारत आपण भाजपला जवळपास रामराम केला आहे याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अकलूज येथे झालेल्या कार्यक्रमात पवारांच्या स्टेजवर जाऊन रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आपण जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे असे वक्तव्य केल्याने मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. रणजीत सिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून शरद पवार उमेदवारी देतील असा विश्वास मोहिते पाटील समर्थकांना आहे. त्यामुळे रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी भाजपशी आणि फडणवीस यांची असणारे संबंध सध्या उघडपणे तोडल्याचे दिसत आहे. 


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढ्यात झालेल्या फडणवीसांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानंतर जोरदार चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र सोलापूर आणि अक्कलकोट या दोन्ही कार्यक्रमात परिचारक यांनी हजेरी लावल्याने सध्या तरी परिचारक भाजप सोबत आहेत असे चित्र दिसत असले तरी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याशी एक शब्दाचाही संवाद न झाल्याने या दोघातील विसंवाद भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे. प्रशांत परिचारक यांच्या मदतीने गेल्या पोटी निवडणुकीत समाधान आवताडे आमदार बनले मात्र नंतरच्या काळात या दोघांमध्ये वितुष्ट आल्याने आमदार समाधान आवताडे व परिचारक हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. 


पंढरपूर एमआयडीसी व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आले असता प्रशांत परिचारक यांनी अवताडे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे परिचारक अक्कलकोट व सोलापूर येथील फडणवीस यांच्या कार्यक्रमाला येणार का याबाबत चर्चा रंगल्या होत्या. प्रशांत परिचारक यांनी या दोन्ही कार्यक्रमाला हजेरी लावली मात्र या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता इतर कोणाशीही परिचारक बोलताना दिसले नाहीत. फडणवीस यांचे भाषण सुरू असताना प्रशांत परिचारक हे अजितदादांच्या शेजारी बसून जवळपास दहा ते पंधरा मिनिटे त्यांच्याशी बोलताना दिसून आले. 


त्यामुळे आमदार समाधान आवताडे व परिचारक यांच्यातील तेढ टोकाला गेल्याचे इतर भाजप नेत्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. गेल्या काही दिवसापासून प्रशांत परिचारक हे तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू आहे. परिचारक यांनी उघडपणे थेट शरद पवार यांची भेट घेतली नसली तरी परिचारक हे मूळचे पवारांच्या निकटवर्ती आहे पैकी एक असल्याने परिचारक काय निर्णय घेणार हे लवकरच दिसणार आहे. सध्या तरी प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीबाबत कोणतेही वक्तव्य केले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. आता भाजपने उमेदवारी डावल्यास परिचारक तुतारीकडे जाणार की अपक्ष उभा राहणार याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांतही संभ्रम आहे. मात्र सोलापूरच्या कार्यक्रमात ज्या पद्धतीने प्रशांत परिचारक स्टेजवर अलिप्तपणे वावरत होते ते पाहता परिचारक ही लवकरच फडणवीसांना धक्का देणार याचे संकेत मिळत आहेत.