सोलापूर : खिरापतीसारखी पदे वाटली जातात आणि यातील अनेक पदाधिकारी मंत्रालय आणि वर्षा बंगल्यासमोर ठेकेदारीसाठी फिरतात. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने चालत नाही आणि त्यांच्या विचारांपासून ही शिवसेना (Shivsena) लांब चाललीये, असं म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते तानाजी सांवत (Tanaji Sawant) यांनी स्वतःच्याच पक्षाबाबत संताप व्यक्त केला. 


बाळासाहेबांच्या काळात 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण होतं. मात्र आज त्यांच्या विचारांपासून शिवसेना दुरावत असल्याचं म्हणत पक्षातील काही नेत्यांवर टीका केली. तसेच त्यांनी काही पदाधिकाऱ्यांचे कान देखील टोचलेत. 


लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं - तानाजी सावंत


पदाधिकारी ठेकेदारी करत का फिरतात याबाबत तानाजी सावंतांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, मी कानपिचक्या नाही दिल्या मात्र काही पदाधिकारी असे वागतात. सध्या निवडणुकीचा काळ असताना लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणं जास्त गरजेचं आहे. हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना आहे आणि तेच मी बोललो. 


केवळ अंहकारापोटी त्यांनी केंद्रातील निधी आणला नाही - तानाजी सावंत


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील तानाजी सावंत यांनी यावेळी निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, त्यांच्या काळात केवळ अंहकारापोटी केंद्रातील आरोग्याचा निधी आणला नाही. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याला 25 हजार कोटींचा निधी मिळाला. त्यांच्या काळात अहंकारामुळे राज्याचे नुकसान झाले. या अर्थसंकल्पात आपण 22 हजार कोटी म्हणजेच 6 टक्के एवढी रक्कम अर्थ खात्याला मागितली आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे रुपडे पालटेल, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षामध्ये फूट, भाऊ रामहरी मेंटेंचा रामराम, नव्या संघटनेची केली घोषणा