सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप ऑफरचा दावा केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सोलापूरचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यानंतर शिंदे यांना कोणतीही ऑफर दिली नसल्याचा दावा केला.  


राजकीय भेट कधी झाली ही वर्षानुवर्षे कळत नाही


सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, नितीन गडकरी यांच्यासारखे आमच्या पक्षातील काही नेते असून ते मित्र आहेत. आताही सुशीलकुमार यांनी त्यांची आठवण काढली. त्यापैकीच कुणीतरी त्यांना विचारले असेल. मात्र, त्याला राजकीय ऑफर म्हणता येणार नाही. राजकीय भेट कधी झाली ही तुम्हाला वर्षानुवर्षे कळत नाही, ती गुप्त असते. जेव्हा केव्हा सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय भेट होईल तेव्हा ती तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सुशीलकुमार शिंदे यांना 2019 किंवा आत्ता भाजपकडून कोणीही त्यांना ऑफर दिलेली नाही. 


तर आम्ही त्यांचे स्वागतच करू 


चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मात्र भाजपतील कोणीतरी नेत्याने आपल्या चांगल्या नात्याच्या आधारे सुशीलकुमारजी  भाजपत येणार का? किंवा मुलीला पाठवणार का? असे विचारले असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे काही सुसंस्कृत कुटुंबं महाराष्ट्रात आहेत. ज्यांच्यावर कोणी शिंतोडे उडवणार नाही. प्रणिती शिंदे यादेखील सर्वासामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत. अशा आक्रमक प्रणिती ताई भाजपत आल्या तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू, पण अशी कोणतेही ऑफर भाजपने दिली नाही आणि त्यांनीही तशी इच्छा व्यक्त केली नाही.


सुशीलकुमार शिंदे यांनी काय दावा केला?


सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोरोटीत हूरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले की, 'माझा दोनवेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. 


आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार? तसेच प्रणिती पक्ष बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, 'लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे शिंदे म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या