बीड : शिवसंग्राम (Shivsangram) पक्षाचे संस्थापक दिवगंत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम पक्षात फूट पडली असल्याची माहिती समोर येतेय. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. तसेच त्यांनी जय शिवसंग्राम या त्यांच्या नव्या संघटनेची देखील स्थापना करणार असल्याच्या घोषणा केलीये. 


दरम्यान रामहरी मेटे हे त्यांच्या याच नव्या संघटनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात करणार आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाची जबाबदारी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आली होती. मात्र काही दिवसांपासून रामहरी मेटे आणि ज्योती मेटे यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते आणि याच वादातून रामहरी मेटे हे पक्षातून बाहेर पडले आहेत. 


रायगडावर नव्या संघटनेची स्थापना


रामहरी मेटे यांनी रायगडावर जाऊन जय शिवसंग्राम या त्यांच्या नव्या संघटनेची स्थापना केली. तसेच महाराष्ट्रातील शिवसंग्राम पक्षातील काही कार्यकर्ते देखील आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय. दरम्यान विनायक मेटे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 


मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - रामहरी मेटे


विनायक मेटे यांच्‍या स्‍वप्‍नातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मारक पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन ते मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया रामहरी मेटे यांनी दिली. राम हरी मेटे हे संघटनेचे प्रमुख राहणार असून सुरेश शेटये पाटील यांची संघटनेच्या महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष पदी निवड जाहीर करण्‍यात आली.  गुरुवार 18 जानेवारी रोजी किल्ले रायगडावर छत्रपतींच्‍या पुतळयाला आणि जगदीश्‍वर मंदिरात अभिवादन करण्‍यात आले. तसचे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 


कोण होते विनायक मेटे?


विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.


हेही वाचा : 


Suraj Chavan : मोठी बातमी! अटकेनंतर कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणांवर कारवाई, 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी