माळशिरस: सध्या माळशिरस तालुक्यातील एक गाव अनाकलनीय दहशतीच्या सावटाखाली वावरताना दिसून येत आहे. गावाला यातून तातडीने दिलासा देण्याची मागणी येथील ग्रामस्थ करू लागले आहेत. माळशिरस तालुक्यातील कण्हेर नावाच्या गावात गेल्या काही दिवसापासून दिवसाढवळ्या उसाचे फड पेटण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे मतदान झाले त्यादिवशी हा पहिला उसाचा फड पेटला आणि पाहता-पाहता ऊस भस्मसात झाला. यानंतर सातत्याने एकपाठोपाठ एक असे जवळपास 30 ते 35 उसाचे फड आगीत भस्मसात झाले आहेत. (Malshiras sugarcane Farm Fire News)


राखणदार असतानाही घडतायत घटना


पहिल्या उसाच्या फडाला आग लागल्यावर ग्रामस्थांनी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला पण कोणतेही कारण समोर आले नाही. विशेष म्हणजे सर्व उसाचे फड हे तोडणीला आलेले किंवा काही ठिकाणी तर उसाची तोडणी सुरु असताना ऊस पेटण्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. पहिल्यांदा ऊस पेटल्यानंतर ग्रामस्थांनी प्रत्येक फडाच्या चारी बाजूने दिवस रात्र पहारा ठेवण्यास सुरुवात केली. मात्र पहारा असूनही अचानक मधूनच उसाला आग लागायची आणि कळायच्या आत संपूर्ण उसाचा फड भस्मसात होत आहे. हा ऊस मोठा करण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला आहे. मात्र, ऐन तोडणीच्या काळात सुरु झालेल्या या घटनेमुळे येथील शेतकरी पार उध्वस्त झाला आहे. 


उसाला लागलेली आग विझवताना अनेक जण जखमी


एकदा ऊस पेटल्यानंतर कितीही प्रयत्न केला, तरी तो विझत नसल्याने ऊस विझविताना काही शेतकरी जखमी देखील झाले आहेत. तर काही जणांना भाजले आहे. चारी बाजूला पहारा ठेवल्यावरही ऊस कसा पेटतो कि कोणी पेटवतो हेच समाजत नसल्याचे शेतकरी धनाजी माने सांगतात. आज सकाळी त्यांचा चार एकर ऊस जाळून गेला आहे. आता हा ऊस तोडायला जादाचे पैसे मोजून साखर कारखान्याला जरी पाठवला तरी त्याला कवडीमोल दाम मिळणार आहेत. अशाच पद्धतीचा अनुभव याच कण्हेर गावातील इतर शेतकऱ्यांना आला आहे. नेमका ऊस जळण्याचा हा आसपासच्या कोणत्याही गावात न घडता फक्त हे प्रकार आमच्या कण्हेर मध्येच का घडत आहेत असा प्रश्न निलेश माने या तरुण शेतकऱ्याला पडला आहे. या प्रकाराबाबत गावातील पोलीस पाटील नितीन यांनाही शंका असून रोज आम्ही जगात पहारा ठेवून असून देखील ऊस जाळण्याचा प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील रूपा बोडरे ही गरीब महिला देखील चिंतेत असून तिचा एक एकर ऊस आधीच जाळला असून आता उरलेला ऊस नीट राहावा म्हणून सगळे घरदार शेताच्या पहाऱ्यासाठी थांबले आहेत. (Malshiras sugarcane Farm Fire News)


पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू


या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने शोध घेऊन याच गावातील उसाला आग कशी लागते किंवा लावली जाते याचा शोध घेण्याच्या सूचना माळशिरसाचे नूतन आमदार उत्तम जानकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. आमदारांच्या सूचनेनंतर या भागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आज गावाला भेट देऊन संपूर्ण प्रकारची माहिती घेतली. उसाला नेमकी आग कशाने लागते याचा तपास सुरु केला जाणार असून या आगीमागचे कारण शोधून काढू असा दिलासा त्यांनी ग्रामस्थांना दिला आहे. मात्र एकाच गावात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या या अग्निकांडामागचा सूत्रधार तातडीने शोधण्याचे आदेश आमदार जानकर यांनी दिल्याने आता पुढील आगीचे प्रकार तरी थांबावेत अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. या अग्निकांडामुळे लाखो रुपयांचे नुकसान कण्हेर ग्रामस्थांचे झाले असून या आगीची अनामिक भीती सध्या सर्वच ग्रामस्थांमध्ये दिसत आहे .