Barshi : बार्शी शहरातील निखिल डुबे याने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत घवघवीत यश मिळावले आहे. देशातील सीए परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.3) रात्री जाहीर झाला. त्यामध्ये, घरातील हालाकीच्या परिस्थितीवर मात करून, अभ्यासातील सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर निखिलने मनी बाळगलेले ध्येय आत्मसात केले. आता, इन्व्हेस्टेमेंट बँकीगमध्ये आपण भविष्यात करिअर करणार असल्याचे त्याने सांगितले. निखिल याने बार्शीत (Barshi) शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशाला म्हणजेच न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. या यशानंतर निखिलचा शाळेच्या संचालकांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आलाय. यावेळी रावसाहेब मनगिरे, महादेव बुचडे, शाळेचे मुख्याध्यापक उंबरदंड, संतोष खुडे, प्राथमिक विभागाचे सातपुते सर, सेवक नारायण वाघमारे, विलास काकडे उपस्थित होते.


अपयश आले तरी खचून न जाता मिळवले यश 


निखिल हे जुनी चाटे गल्ली येथील रहिवासी असून शालेय शिक्षण शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशाला म्हणजेच न्यू हायस्कूल येथे झाले. बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने सीए होण्याचा निश्चय केला. त्यानुसार, बार्शीनंतर पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजमधून कॉमर्समध्ये त्याने पदवी मिळवली. पुढे काही दिवस विप्रो कंपनीत नोकरीही केला. या दरम्यान, नोकरी करत करतही  सीए होण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. परिस्थितीशी दोनहात करत अभ्यास आणि काम दोन्हीची सांगड घालून त्याने अखेर स्वप्नपूर्ती केली. घरातही मोठा भाऊ वगळता आई-वडील किंवा अन्य कोणी फारसे शिकलेले नाही. तरीही निखिलने हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले, अपयश आले तरी खचून न जाता त्याने सीएच्या परीक्षेत यश संपादन केले.
  
कोरोनानंतर त्याने सी.ए.चा दुसरा ग्रुप यशस्वीरित्या पूर्ण केला. मात्र, पहिला ग्रुप एकदा केवळ 8 गुणांनी आणि गेल्यावर्षी केवळ 1 गुणाने तो मागे राहिला. मात्र, अपयश ही यशाची पायरी मानून त्याने पुन्हा तयारीला लागून आता पहिला ग्रुप यशस्वीरित्या पूर्ण करून सीए होण्याचा बहुमान मिळवला आहे. कुंटुंबाचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नातेवाईक व मित्र यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळवू शकलो. जयपूर येथील सीए अतुल अग्रवाल आणि सीए अजय अग्रवाल या शिक्षकांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला, अशी भावना निखिलने व्यक्त केली.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


नवीन वर्षात तरुणांना रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 4200 पदांसाठी भरती सुरु, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता?