सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी लक्षवेधी लढत असलेल्या सोलापूर दक्षिण (Solapur South) मतदारसंघात यंदा चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळाला. राज्यात पहिल्यांदाच तीन पक्षांची महाविकास आघाडी झाल्याने जागावाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाने आपल्याकडे घेतली. त्यामुळे, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवाराने बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. दरम्यान, गत निवडणुकीत येथील मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेना (shivsena) ठाकरे गटाने अमर पाटील या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. तर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या धर्मराज काडादी यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे, येथील महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून आलं. 


राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली असून यंदाच्या निवडणुकीत बटेगे तो कटेंगे, लोकशाही, गुजरातला उद्योग पळवणे, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरुन प्रचारात रणकंदन माजल्याचं पाहायला मिळालं. अनेक दिग्गजांनी सोलापुरात सभा घेतल्या. भाजप नेत्या माधवी लता, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवण कल्याण यांच्या सभा झाल्या. तर, असदुद्दीन ओवैसी यांनीही सभा गाजवली. त्यामुळे यंदा सोलापूरच्या तीन मतदारसंघात कोण वरचढ ठरतं हे लवकरच स्पष्ट होईल. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड 


लोकसभा 2024 च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस महाविकास आघाडीला यश मिळालं. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याने भाजपने येथील दोन्ही जागा गमावल्या आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत भाजप कमबॅक करणार की महायुतीला फटका बसणार हे पाहावे लागेल. लोकभा निवडणुकीत येथील सोलापूर दक्षिण मतदारसंघातही भाजप महायुतीच्य उमेदवाराची पिछेहट झाली. विद्यमान आमदार भाजपचे असतानाही 9,400 मतांचे मताधिक्य काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना मिळाले आहे. त्यामुळे, यंदा महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जाते. गत 10 वर्षांपासून भाजप आमदार असलेल्या येथील विधानसभा मतदारसंघात जनता कोणाच्या पाठीशी राहिल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी 74 हजार मतांनी विजय मिळवत भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला होता.  


2019 च्या विधानसभेला काय झालं?


भाजप नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या सुभाष देशमुख यांनी गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. सुभाष देशमुख यांना 87,223 मतं मिळाली होती. त्यांनी काँग्रेस नेते मौलाली बाशुमिया सय्यद (बाबा मिस्त्री) यांचा पराभव केला होता. बाबा मिस्त्री यांना 57,976 मतं मिळाली होती, त्यामुळे देशमुख यांनी त्यांचा 29,247 मतांनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं.


हेही वाचा


Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!