सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक मोठ्या उत्साहात आणि दिग्गजांच्या प्रचारात पार पडली. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर मध्य (Solapur central) मतदारसंघात मात्र कायम काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यानंतर त्यांची कन्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी मतदारसंघावर पकड ठेवली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे ह्या खासदार झाल्यानंतर कांग्रेसकडून येथील मतदारसंघात चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यंदाही येथील निवडणूक तिरंगी झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस महाविकास आघाडीकडून चेतन नरोटे, भाजप महायुतीकडून देवेंद्र कोठे आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीकडून नरसय्या आडम यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे, सोलापूर मध्यची जतना कोणाच्या बाजुने उभी राहते, हे पाहावे लागेल. 


राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली असून यंदाच्या निवडणुकीत बटेगे तो कटेंगे, लोकशाही, गुजरातला उद्योग पळवणे, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरुन प्रचारात रणकंदन माजल्याचं पाहायला मिळालं. अनेक दिग्गजांनी सोलापुरात सभा घेतल्या. भाजप नेत्या माधवी लता, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवण कल्याण यांच्या सभा झाल्या. तर, असदुद्दीन ओवैसी यांनीही सभा गाजवली. त्यामुळे यंदा सोलापूरच्या तीन मतदारसंघात कोण वरचढ ठरतं हे लवकरच स्पष्ट होईल. तर, येथील मतदारसंघात कोण बाजी मारणार हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड 


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. येथील सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे खासदार बनल्या. तर, माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे, यंदा महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जाते. त्यातच, सोलापूर मध्य हा प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असून लोकसभा निवडणुकीतही त्यांना येथून मताधिक्य आहे. मात्र, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून केवळ 796 मतांचं मताधिक्य प्रणिती शिंदेंना मिळालं आहे. त्यामुळे, विधानसभेला येथील जनता कोणाच्या पाठीशी राहिल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत 74 हजार मतांनी विजय मिळवत भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला होता.  


2019 च्या विधानसभेला काय झालं?


गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळाली होती. येथील मतदारसंघात प्रणिती शिंदे (काँग्रेस), फारुख शाब्दी (एमआयएम), नरसय्या आडम (माकप), दिलीप माने (शिवसेना), महेश कोठे (अपक्ष) अशी बहुरंगी लढत झाली होती. त्यामध्ये, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी 12,719 मतांनी विजय मिळवला होता, त्यांना 51,440 मतं मिळाली होती, तर, दुसऱ्या क्रमांकावर एमआयएम उमेदवार हाजी फारुख मकबल शब्दी यांनी मतं घेतली होती. शब्दी यांना 38,721 मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महेश कोठे यांनी 30,081 मतं घेतली होती. मात्र, यंदा काँग्रेसने नवख्या उमेदवाराला तिकीट दिलं असून दिलीप माने यांनीही आपला अपक्ष अर्ज ऐनवेळी माघारी घेतल्याचं दिसून आलं. 


हेही वाचा


Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!