Siddheshwar Yatra Solapur : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या (Siddheshwar Temple) यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे मंदिरात यात्रेच्या (Siddheshwar Yatra) तयारीची लगबग सुरूय. तर दुसरीकडे यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्यामध्ये 'संमती वाचन'च्या मानावर दावा करत जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरचे वतनदार असलेल्या शेटे कुटुंबातील सिद्धेश्वर शेटे यांनी सोलापूर न्यायालयात दावा दाखल केला असून या संदर्भात आतापर्यंत सहा सुनावणी देखील पार पडल्या आहेत. 'सुमारे शंभर वर्षांपूर्वी आजोबा गुरुसिद्धप्पा शेटे यांचे निधन झाल्यानंतर यात्रा काळात दुसऱ्या एका शेटे परिवारातील व्यक्तीकडे संमती वाचनसाठी दिली होती. मात्र परत देण्याच्या बोलीवर पोथी आणि मानाची पगडी दिली होती. मात्र त्या परिवारातील सुहास शेटे यांनी आजतागायत परत केली नाही. आम्ही पेशवेकालीन वतनदार असून संमती वाचनाचा मान आमचाच आहे. आम्ही वतनदार असल्याचे अनेक ऐतिहासिक कागदपत्रे आमच्याकडे आहेत,' असा दावा सिद्धेश्वर शेटे यांनी केला आहे.


श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील विविध पद्धतीच्या धार्मिक विधी आहेत. ह्या प्रत्येक विधीचा मान शहरातील विविध कुटुंबाना आहे. यातील संमती वाचनाचा मान हा सध्या सुहास शेटे यांच्या घराण्याकडे शंभर वर्षापासून आहे. मात्र त्यापूर्वी हा मान आमच्या घराण्याचा आहे. शंभर वर्षांपूर्वी आजोबा लहान असल्याने सुहास शेटे यांच्या परिवाराकडे पोथी आणि पगडी देण्यात आली होती. आता त्यांनी ती परत करावी. तसेच संमती वाचनाचा मान हा सिद्धेश्वर शेटे यांना मिळावा अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात प्रतिवादी असलेले आणि सध्या ज्यांच्याकडे संमती वाचनाचा मान आहे त्या सुहास शेटे यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  


या प्रकरणी सोलापुरात न्यायालयात दावा दाखल करणारे सिद्धेश्वर शेटे यांच्या म्हणन्यानुसार " त्यांचे वंशज हे चालुक्य काळातीलशेटे घराणे असून माधवराव पेशव्यांनी 1768 मध्ये अणदूर ते मंद्रूप भागासाठी वतनदार म्हणून नेमले. त्यामुळे सोलापूर आणि आजूबाजूच्या आणखी गावातील धार्मिक कार्य आणि त्यातून मिळणाऱ्या महसूलाची जबाबदारी देखील त्यांची होती. तसेच सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर यात्रेत संमती वाचनाचा मान ही होता. त्यांचे आजोबा गुरुसिद्धप्पा शेटे यांचे अचानक निधन झाले. त्यांच्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे वय हे कमी होते. त्यामुळे त्यांना संमती वाचन करता येणार नव्हती. तेव्हा यात्रेत खंड पडू नये म्हणून शेटे नावाच्या एका दुसऱ्या परिवाराला मानाची पगडी आणि संमती पोथी देण्यात आली. सुरुवातीला ही पोथी दरवर्षी यात्रेला घेऊन जायचे नंतर परत आणून द्यायचे मात्र कालानंतराने त्यांनी पोथी परत आणून द्यायचे बंद केले. काही वर्षाचा खंड पडल्यानंतर आम्ही त्यांना पोथी परत मागीतली तर त्यांनी देण्यास नकार दिला. त्यामुळे जुलै 2023मध्ये आम्ही जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. यासाठी पेशवेकालीन मोडी लिपीतील कागदपत्रे देखील सादर केले आहेत." अशी माहिती सिद्धेश्वर शेटे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.