Solapur Politics : चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election) पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलं. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या, तर शिंदेंच्या शिवसेनेने 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 42 जागा मिळवल्या. मात्र, महाविकास आघाडीचा राज्यात दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीत सर्व पक्षाच्या मिळून केवळ 50 जागा निवडून आल्या आहेत. मविआचा राज्यात दारुण पराभव झाला असला तरी सोलापूर जिल्ह्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) साथ दिली. सोलापुरात जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या 5 जागा निवडून आल्या. तर महायुतीने देखील पाच जागांवर विजय मिळवला. सांगोल्याच्या जागेवर शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत बार्शी तालुक्याने देखील महाविकास आघाडीला साथ दिली. बार्शीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा पराभव केला होता. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांनी एकाच बसमधून प्रवास केलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात...
दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊतांचा एकाच बसमधून प्रवास
गेल्या काही महिन्यांपासून बार्शीच्या बस डेपोतील गाड्या खराब आहेत, प्रवास करण्यायोग्य नाहीत, अशा तक्रारी सुरु होत्या. बार्शीतून निघणाऱ्या बस गाड्या मध्येच बंद पडत होत्या. त्यामुळे बार्शीतील नागरिकांसह बस चालक देखील हैराण झाले होते. दरम्यान, बार्शीच्या बस डेपोला नव्या बसेस मिळाव्यात यासाठी बार्शीतील आजी-माजी आमदारांनी प्रयत्न सुरु केले होते. दिलीप सोपल यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन नव्या 20 बसेस मिळाव्यात अशी विनंती केली होती. तर राजेंद्र राऊत यांनी देखील पत्र लिहित शासन दरबारी पाठपुरवठा सुरु केला होता. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केल्यानंतर बार्शीला नव्या बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे बार्शीतील प्रवाशांनी खराब गाड्यांपासून मोकळा श्वास घेतलाय. दरम्यान, बार्शीत नव्या बसेस आल्यानंतर राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. दोन्ही नेत्यांनी नव्या बसेस येताच बार्शीचं बस स्टँड गाठलं आणि लोकार्पण करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही नेते एकाच बसमध्ये शेजारी-शेजारी बसलेले पाहायला मिळाले आहेत. दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊतांचे शेजारी-शेजारी बसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
निवडणुकीत 'छन्नाछन्नी' झाली, पण आता शेजारी बसून प्रवास
बार्शीच्या राजकारणात दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. विधानसभेच्या सहा निवडणुका दोन्ही नेत्यांनी त्यांनी एकमेकांविरोधात लढल्या आहेत. यामध्ये राजेंद्र राऊत 2 वेळेस विजयी झाले आहेत. तर दिलीप सोपल यांनी 4 वेळेस बाजी मारली आहे. दिलीप सोपल हे तब्बल 7 वेळेस बार्शीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. "माझे विरोधक हे सोपलचं आहेत. आमच्यात 'छन्नाछन्नी' असते, हे सर्वांना माहिती आहे. आमच्यामध्ये 2-5 हजार मतांचा फरक असतो",हे देखील सर्वश्रूत असल्याचं राजेंद्र राऊत एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते. त्यामुळे चार महिन्यापूर्वी निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपलांनी एकाच बसमधून प्रवास केल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दिग्गजांच्या भूवया उंचावल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या